हे पक्षवाढीचेच काम आहे !
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यावेळी आबासाहेब निंबाळकर अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते एकदा यशवंतरावांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याबरोबर त्यावेळचे काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते बाळासाहेब विखे - पाटील होते.
कार्यकर्त्यांना नावाने आणि एकेरी हाक मारणे हे चव्हाण साहेबांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य होते. बाळासाहेबांना त्यांनी विचारले,' एकनाथ, जिल्ह्यात काय चाललंय ?'
बाळासाहेब म्हणाले, ' जिल्ह्यात विरोधी पक्षांचा मोर्चा आहे. ते मुळा धरणाचं पाणी मागत आहेत. पण साहेब, त्यांना कोणी साथ देणार नाही. लोक त्यांच्याबरोबर नाहीत. तुम्ही मोर्चाची काळजी करू नका.'
यावर यशवंतराव गंभीरपणे म्हणाले, ' मी वाचलंय वर्तमानपत्रात. कॉम्रेड दत्ता देशमुखांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा निघतोय. एकनाथ, दत्ताला निरोप दे. खूप मोठा मोर्चा काढ म्हणावं. मी मोर्चाला सामोरे जाऊन स्वागत करणार आणि पाणी देण्याची घोषणा करणार. ' यशवंतरावांचे हे धोरण कार्यकर्त्यांना समजेना. ते बुचकळ्यात पडले. विरोधी पक्ष मोर्चा काढणार, मुख्यमंत्री त्या मोर्चाला सामोरे जाणार आणि त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करणार. मग पक्ष कसा वाढणार ? कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यशवंतरावांनी कार्यकर्त्यांच्या मनात चाललेला गोंधळ ओळखला. ते म्हणाले, ' हे बघा, घोषणा मी करणार. मी म्हणजे कोण ? तर मुख्यमंत्री. मुख्यमंत्री कोणाचा ? तर तुमचा, म्हणजेच काँग्रेसचा, म्हणजे घोषणा कोण करणार ? तर काँग्रेस . मग भीती कशाला बाळगता ? आपला पक्षच घोषणा करणार आहे हे पक्षवाढीचे काम आहे.' यशवंतरावांनी दिलेले स्पष्टीकरण ऐकून सगळे निरुत्तर झाले.
आजपर्यंत त्यांनी यशवंतरावांच्या मुत्सद्देगिरीविषयी ऐकले होते. आज त्यांना तिचे प्रत्यक्ष दर्शन घडले.