यशवंतराव चव्हाण
लेखक : अनंतराव पाटील
--------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
मनोगत
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मासन असून ती जबाबदारी मी स्वीकारावी अशी इच्छा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. दादासाहेब रुपवते यांनी गेल्या नोव्हेंबरात व्यक्त केली. पुण्यातील भेटीत हे अचानक घडले आणि मला आश्चर्य, आनंद आणि अभिमानही वाटला. मी दादासाहेबांना म्हटले, 'दादासाहेब, यशवंतरावजी हे आपणा सर्वांचे दैवत, त्यांनीच आपल्याला घडविले, वाढविले आणि मोठे केले. साहेबांची आतांपर्यंत बरीच चरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. मराठीत आणि इंग्रजीत त्यांच्याबद्दल पुस्तकरूपाने बरेच लिखाण झालेले आहे. वृत्तपत्रातूनही खूप लिहिले गेले आहे. स्नेही-सहकार्यांनी आग्रह केल्यानंतर यशवंतरावजींनी आत्मचरित्रपर लेखन करण्यास सुरुवात केली. 'कृष्णाकांठ' हा चरित्राचा पहिला खंड प्रसिद्धही झाला. त्यानंतर 'सागरकांठ', 'यमुना कांठ' हे दोन उरलेले खंड त्यांना लिहावयाचे होते. तथापि नियतीने ती संधी न देता अचानकपणे आमच्यापासून त्यांना दूर नेले. यशवंतरावजींच्या संपूर्ण आत्मचरित्राला आम्ही मुकलो. राजकारण आणि प्रशासन, दौरे आणि जाहीर सभा, विधिमंडळ आणि पार्लमेंट या व्यापांत यशवंतरावांना निवांत वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे आम्ही एका चांगल्या आत्मचरित्रापासून वंचित राहिलो.'
यशवंतरावांसंबंधी प्रकाशित झालेले यापूर्वीचे कांही ग्रंथ, कांही पुस्तके, कांही लिखाण मी मिळविले आणि टांचणे काढण्यास सुरुवात केली. चव्हाणसाहेबांचे चरित्र लिहायचे ही कामगिरी किती मोठी आणि बिकट आहे याची कल्पना आली. तथापि ही कामगिरी पार पाडायची असा निर्धार करून वाचन, टिपण, गांठीभेटी, मुलाखती असा क्रम सुरू केला. चरित्र लेखनाबाबतचा आत्मविश्वास वाढू लागला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांची डिसेंबरात पुण्यात गांठ पडली. त्यांच्या कानावर प्रकल्पाची माहिती घातली. त्यांनीही सर्व प्रकारचे सहकार्य देऊ केलें. नंतर २६ जानेवारी, १९९७ ला कार्याध्यक्ष श्री. मोहन धारिया भेटले. ते म्हणाले, 'यशवंतरावजींच्या चरित्र लेखनाची जबाबदारी तुम्ही अंगावर घेतली हे फार चांगले झाले. वास्तविक हे काम यापूर्वीच व्हायला हवे होते, आता मात्र उशीर नको.' बोलता बोलता त्यांनी दोन कल्पना माझ्यापुढे मांडल्या. ते म्हणाले, 'अनंतराव, तांतडीने आज कशाची गरज असेल तर ती विद्यार्थ्यांनी, नव्या तरुण पिढीने, लिहिता वाचता येणार्या सर्वसामान्य मराठी माणसाने, मराठी जाणणार्या महाराष्ट्रातील अमराठी माणसाने यशवंतरावांचे चरित्र वाचण्याची, ते जाणून घेण्याची गरज आहे. ज्यांना राजकारणात पडावयाचे आहे, राजकारण करायचे आहे त्यांनी यशवंतराव चव्हाण जाणून घ्यायला हवेत. त्यांच्या चरित्रापासून खूप शिकण्यासारखे असल्याने प्रथम वरील वाचकांसाठी चव्हाणसाहेबांचे चरित्र त्वरित उपलब्ध करून देऊ आणि नंतर यशवंतरावजींचे समग्र विस्तृत ग्रंथवजा चरित्र प्रकाशित करू' मला त्यांची कल्पना रुचली. मी म्हटले, ''मोहनभाई, दहा-बारा फॉर्मचे (२०० पाने) छोटे चरित्र तुम्हाला लवकरात लवकर लिहून देण्याची शिकस्त करतो. तुम्ही छपाईची, प्रकाशनाची तयारी करा. साहेबांच्या ८३ व्या वाढदिवशी, १२ मार्चला आपण ते उपलब्ध करून देऊ.'' धारियांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि 'गो अहेड' म्हणत निरोप घेतला. तथापि ही तारीख काही कारणांनी पुढे न्यावी लागली आणि १ ऑगस्टपर्यंत देण्याचे निश्चित करण्यात आले.