यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य

Rajkaran Aani Sahitya


यशवंतराव चव्हाण

   राजकारण आणि साहित्य
      

संपादक : भास्कर लक्ष्मण भोळे
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

''.....आम्हां

राजकारण्यांचे मार्ग किती पसंत पडतात कोण जाणे.  कांही जीवन निष्ठा आणि परिस्थितीचे निदान यांच्यावर अवलंबून राहून निर्णय घ्यावे लागतात.  माझ्या जीवनांत असे प्रसंग अनेक आलेले आहेत.  अशाच एका प्रसंगातून मी आज चाललो आहे.  अनेक मित्रांचे गैरसमज झाले परंतु त्याची चिंता करता उपयोगी नाही...''

आपला
यशवंतराव चव्हाण

लेखकाचे मनोगत

महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्याही राजकारणात आपले वेगळेपण सांभाळून अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेले यशवंतराव चव्हाण हे एक असामान्य नेते होते.  १९८४ च्या अखेरीस त्यांचे निधन झाले.  निधनप्रसंगी यशवंतरावांचा अनेक परींनी तेजोभंग झालेला होता.  बजुजन-समाजातून वर आलेला आणि अनेक अतुलनीय अभिजात गुणांची स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात जाणीपूर्वक जोपासना केलेला हा धुरंधर मुत्सद्दी श्रीमती गांधींच्या विधिनिषेधशून्य राजकारणामुळे सर्वस्वी निःसंदर्भ व एकाकी ठरून राजकीय विजनवासात कालक्रमणा करीत असताना त्यांचा देहांत झाला.  यशवंतरावांच्या या अशा, परिस्थितिवशात अधिकच शोककारी ठरलेल्या निधनामुळे प्रस्तुत लेखकाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व नेतृत्वाचे विश्लेषण करण्यची बुद्धी झाली आणि तो तेव्हापासूनच साधनांच्या जुळवाजुळवीस लागला.  

या वर्षी दिवाळी अंकांसाठी संपादकांनी केलेल्या मागण्या पूर्ण करताना निरनिराळ्या विषयांवर संकीर्ण लेखन करून काळ आणि श्रम घालवण्याऐवजी यशवंतरावांच्याच व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर स्वतंत्र लेख लिहून ते सार्थकी लावावेत, असे ठरवले.  त्यानुसार काही लेख दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाले.  सदर पुस्तक हे त्या लेखांच्या निमित्ताने केलेल्या परिश्रमांचेच फलित आहे.