यशवंत चिंतनिका

Yashwant Chintanik
यशवंत - चिंतनिका


प्रकाशक - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
---------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

प्रस्तावना

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर रसिकाग्रणीही होते. मुख्यमंत्री पदानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती अनेक महत्त्वाची पदे भूषविली; परंतु राजकीय जीवनाच्या धकाधकीतूनही त्यांनी साहित्य व कला यांचा मनसोक्त्त आस्वाद घेतला. एका दृष्टीने त्यांचे व त्यांच्या पिढीचे जीवन भारताच्या स्वातंत्र्यचळवळीच्या मुशीतून संपन्न व साकार झाले. साहजिकच महात्मा गांधी व पंडीत नेहरू यांच्या विचारसरणीचा यशवतंरावांवरती मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर मार्क्सवादातील बुध्दिवादी विश्लेषण व मानवतावाद हे त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय होते. सक्रिय राजकारणातील प्रत्यक्ष अनुभव, बुध्दिवादी भूमिकेतून केलेले वेगवेगळ्या तत्त्वप्रणालींचे विश्लेषण आणि समाज व देश घडविण्याच्या संदर्भात सातत्याने चालणारे चिंतन यांतून त्यांच्या तात्त्विक बैठकीला एक पक्केपणा आलेला दिसतो. भारतीय लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता या विषयांवरील त्यांच्या विचारांतून हा पक्केपणा जाणवत राहतो. भारतीय आणि संस्कृती यांबाबतही त्यांचे उत्कट उदगार प्रेरक व विचारप्रवर्तक आहेत. सामाजिक व राजकीय विषयांप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे सुखदु:खाचे, आशानिराशेचे अनुभव येतात त्याविषयीं यशवतंरावांचे भाष्य प्रत्ययकारी आहे. आत्मचरित्रात्मक लेखनातुन व लिखित स्वरूपात उपलब्ध असलेले विचार त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व चित्रित करतात. श्री. राम प्रधान यांनी संपादित केलेल्या व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या ‘शब्दाचे सामर्थ्य’ या पुस्तकात यशवंतरावांचे विचारधन संग्रहित केलेले आहे. त्यापैकी काही वेचक विचार केंद्राच्या प्रवेशद्वारी असलेल्या फलकावर क्रमाक्रमाने गेले वर्षभर प्रकटणे मांडण्यात आले. यशवंतरावांच्या विसाव्या पुण्यातीथीला त्या विचारांचा संग्रह या पुस्तिकेच्या रूपाने उपलब्ध करून देताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने मला विशेष आनंद होत आहे. 

- शरद पवार
२५ नोव्हेंबर २००४