शैलीकार यशवंतराव १

Shailidar Yashwantrao
शैलीकार यशवंतराव

लेखक : प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख
-------------------------------- 

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

 शुभेच्छा !

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील प्रा. डॉ. शिवाजी मारुती देशमुख यांनी मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जीवनातील घडामोडी, जडणघडण, त्यांच्या व्यक्तीमत्त्वा-वरील संस्कार, साहित्यनिर्मिती, प्रासंगिक भाषणे यांचा संशोधनात्मक पद्धतीने विचार करून 'शैलीकार यशवंतराव' हा ग्रंथ सिद्ध केला आहे, याबद्दल मी डॉ. देशमुख यांचे अभिनंदन करतो.  

मा. यशवंतराव चव्हाण जे जनताभिमुख लोकनेते, साहित्य, कला, संस्कृती यांचे उत्तम जाणकार होते.  ते जीवनभाष्यकार होते.  माणूस हा यशवंतराव चव्हाण यांच्या चिंतनाचा विषय होता, तोच त्यांचा लेखनविषय होता.  समाजातल्या सामान्य माणसावर मायेची पखरण घालणारे मा. चव्हाणसाहेब हे सुसंस्कृत राजकर्ते होते.  साहित्य, कला राजकारण यामध्ये समन्वय साधणारे एक साहित्यिक म्हणून व साहित्यप्रेमी म्हणून मा. चव्हाणसाहेब यांचे योगदान मोठे आहे.  शब्दांच्या सामर्थ्यावर त्यांचा नितांत विश्वास होता.  विचार, भावना आणि कल्पना यांच्या बळावर त्यांनी सकस ग्रंथनिर्मिती केली.  त्यांचे 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', 'कृष्णाकाठ', 'भूमिका' यासारखे ग्रंथ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत.

मा. चव्हाणसाहेबांच्या जीवनकार्याच्या प्रकाशझोतात राहून राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी वाटचाल केली.  त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्‍न केला.  मा. चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांची उन्नती व्हावी, शेती उद्योगधंद्यात प्रगती व्हावी म्हणून राजसत्तेचा वापर लोककल्याणाकरिता केला.  महाराष्ट्रात त्यांनी पायाभूत आणि मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.

मा. चव्हाणसाहेबांच्या चार प्रेमाच्या शब्दांतून लोकांना जे मिळायचे त्याचे मोल कुठल्याही पदापेक्षा मोठे होते.  जे नेते केवळ सत्तेसाठी उभे असतात, त्यांची सत्ता गेली की ते मोकळे झालेले दिसतात.  खरे तर सत्ता नसते, तेव्हाच नेता, कार्यकर्ता नात्याची परीक्षा होत असते.  कै. यशवंतराव चव्हाणसाहेब, कै. वसंतदादा पाटीलसाहेब, शरद पवारसाहेब या तीन्ही नेत्यांना अनेकवेळा पदापासून दूर रहावे लागले, पण त्या काळाचा वापर त्यांनी नाती दृढ करण्यासाठी करून घेतला.  पद, खुर्च्या बाजूला गेल्या तरी नात्याची वीण पक्की झाली.  म्हणूनच जनमानसातील त्यांचे नेतेपण कायमच अढळ राहिले आणि लोकमानसातील त्यांचे स्थान अधिकच आदरणीय झाले.  मा. यशवंतराव चव्हाण यांच्या एकूणच जीवनाकडे पाहताना त्यांची उपक्रमशीलता, त्यांची मानवतावादी वृत्ती लक्षात येते.  भाषा, कल्पनाशक्ती, वाङ्‌मयनिर्मिती व जीवन-तत्त्वज्ञान यांचे परस्परांशी असणारे नाते आणि त्यांचा संस्कृतीशी असणारा अनुबंध डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या 'शैलीकार यशवंतराव' या ग्रंथाच्या निमित्ताने जाणून घेता येईल.

''यशवंतरावांचा पिंड ललितलेखनाचा होता.  त्यामुळे त्यांनी केलेले गद्यात्मक लेखन लालित्याचा धर्म घेऊन येते.  त्यांच्या वैचारिक गद्य लेखनात त्यांच्या सकस आणि संपन्न विचाराचे दर्शन होते.  यशवंतरावांचा साहित्य संसार समाजप्रबोधन आणि समाजचिंतन या अंगाने जात असल्यामुळे त्यांच्या ललित लेखनातदेखील समाजचिंतनच आढळते.  अनुभव कथन व आत्माविष्कार ही प्रेरणा स्वीकारून त्यांचे लेखन झाले आहे.''  प्रस्तुत ग्रंथात डॉ. देशमुख यांनी यशवंतरावांच्या साहित्याच्या संदर्भात असे विचार नोंदवले आहेत.  त्यातून त्यांच्या लेखनातील प्रगल्भता लक्षात येते.

मा. चव्हाणसाहेबांच्या भाषणात आणि लेखनात समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे.  या सामर्थ्याचा शोध घेणे हे संशोधकांनासुद्धा एक आव्हान आहे.  कारण त्यांचे साहित्य वर्तमानकाळाशी निगडीत असले तरी त्यात भूतकाळाचे अनेक संदर्भ असतात आणि उज्ज्वल भविष्यकाळाची दृष्टी दिसते.  या ग्रंथाच्या रूपाने त्यांच्या साहित्यिक जडणघडणीचा एक वैचारिक ठेवा आपल्या हाती पडत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.  वाचक आणि अभ्यासक या ग्रंथाचे स्वागत करतील अशी मला आशा आहे.  या पुढील काळात राजकारणातही नवी मूल्य देणार्‍या आदर्श राजकर्त्यांच्या भाषणावर त्यांच्या साहित्यावर, साहित्यकृतीवर विविध संशोधकांनी प्रकाशझोत टाकला पाहिजे, अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो.  डॉ. शिवाजी देशमुख यांच्या या ग्रंथास मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

आर. आर. पाटील (आबा)
माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
(अध्यक्ष : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर)