कथारुप यशवंतराव- आमचे बोट सर्वसामान्यांच्या नाडीवर !

आमचे बोट सर्वसामान्यांच्या नाडीवर  !     
  
जनतेचे समाधान ही यशस्वी राज्यकारभाराची पहिली कसोटी आहे अशी यशवंतरावांची धारणा होती. सामान्यातील सामान्य माणसाला सरकार आपले वाटले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष बहुमताने सत्तेत येत होता, याचे कारण त्यांनी काँग्रेसची नाळ सामान्य जनतेपासून तुटू दिली नाही, हे होते.

एकदा सात्रळ ( जि. अहमदनगर ) येथे एका जाहीर सभेत विरोधी पक्षाचे एक नेते गमतीने यशवंतरावांना म्हणाले, ' नेहमी तुम्हीच सत्तेवर येता. आमचं नक्की चुकतं कुठं ?'

या प्रश्नाचं उत्तर यशवंतरावांनीही मिश्किलपणे दिलं. ते आपल्या भाषणात म्हणाले, ' पुन्हा पुन्हा आम्ही सत्तेत कसे येतो याचं कारण तुम्हीच शोधा. कारण आम्ही तुम्हाला ते रहस्य सांगितले तर आम्ही सत्तेवर कसे येणार ? आमचे बोट नेहमी सर्वसामान्यांच्या नाडीवर असते. ती नाडी जे सांगते तसे आम्ही जनतेशी वागतो. जोपर्यंत विरोधकांना ही नाडी सापडत नाही, तोपर्यंत आम्हीच सत्तेवर येणार. नियतीनेच आम्हाला राज्य चालविण्याची आणि तुम्हाला प्रश्न सुटेपर्यंत विरोध करण्याची जबाबदारी दिली आहे. ती आपण सर्व मिळून अचूक पार पाडू.' या उत्तरावरून यशवंतरावांची समयसूचकता लक्षात येते.