यशोधन

Yashodhan 76
यशोधन

यशवंतराव चव्हाण यांचे निवडक विचार

संकलन : विनायक पाटील
---------------------------------

pdf inmg   Ebook साठी येथे क्लिक करा

तो राजहंस एक

‘यशोधन’ची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली, तेव्हा देशात आणीबाणी होती.

साप्ताहिक ‘माणूस’ चे संपादक व राजहंस प्रकाशनचे प्रमुख श्री. ग. माजगांवकर हे माझे मित्र.

‘यशोधन’ची जमवाजमव झाल्यानंतर मी श्री. गं. ना म्हणालो की, हे संकलन ‘राजहंस’ ने प्रकाशित करावे. किंबहुना ‘राजहंस’ प्रकाशित करील, असे मी गृहितच धरले होते. परंतु श्री. गं. नी ‘यशवंतराव चव्हाणांसारख्या सुसंस्कृत राजकारण्याच्या उक्तींचे संकलन, प्रकाशित करण्यास मला आनंदच वाटला असता. शिवाय हे संकलन, तुमच्यासारख्या निकटवर्तीयाने केले आहे; परंतु देशात आणीबाणी जाहीर झालेली आहे व आणीबाणीचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील यशवंतराव चव्हाण हे एक आहेत. म्हणून हे संकलन मी माझ्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करणे, मला योग्य वाटत नाही’ अशी असमर्थता प्रकट केली. आणि तसेच झाले. ‘यशोधन’, ‘राजहंस’तर्फे प्रकाशित झाले नाही.

चिंतामणी लाटकरांच्या ‘कल्पना मुद्रणालया’ कडे ‘यशोधन’ छपाईला पाठविण्याचा निर्णय माजगावकरांनी घेतला व माझ्या सोबत येऊन पुस्तक छपाईला टाकले. सुभाष अवचटांना भेटून मुखपृष्ठाचीही रचना त्यांनीच करून घेतली. ‘कल्पना मुद्रणालया’त बसून स्वत: माजगांवकरांनी मुद्रितेही तपासली. स्वत:च्या कार्यालयात जाण्यापूर्वी ते लाटकरांना भेटून कामाचा आढावाही घेत असत. पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली १९७७ साली. राजकीय निष्ठा व वैयक्तिक मैत्री या भिन्न बाबी आहेत व त्या दोन्ही आपण एकाच वेळी सांभाळू शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ माजगांवकरांनी माझ्यापुढे ठेवला होता. या घटनेचा माझ्या मनावर योग्य तो परिणाम झाला व आयुष्यभर माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक तत्त्व ठरले.

या घटनेला २७ वर्षांचा काळ लोटला. ‘राजहंस प्रकाशन’ चे प्रमुख व श्री. गं. चे धाकटे बंधू दिलीपराव यांचा फोन आला. नशिक येथे ७८ वे साहित्य संमेलन होत आहे. तुम्ही संमेलनाचे कार्यकारी अध्यक्षही आहात. ‘यशोधन’ ची पुढील आवृत्ती काढायला हवी. तात्काळ होकार दिला ! अशी ही सहावी आवृत्ती. आज श्री. ग. आपल्यात नाहीत. आहेत त्यांच्या आठवणी व दिलीप माजगावकरांनी जपलेली कौटुंबिक मैत्रीची भावना. ती अशीच टिकून राहो. वाढो.

- विनायक पाटील