कसोटीचे भाषण
यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हाचा हा प्रसंग. करंजवणे धरणाच्या पायाभरणीचा समारंभ होता. पायाभरणीनंतर त्यांचे भाषण होते. श्रोत्यांमध्ये सगळे धरणग्रस्त लोक होते. ज्यांच्या जमिनी, गावे पाण्याखाली जाणार होती, त्यांच्यासमोर भाषण करायचे होते. प्रसंग बाका होता. धरणग्रस्त प्रचंड संख्येने जमले होते. निषेधाच्या घोषणेपासून ते दंगलीपर्यंत काहीही घडणे शक्य होते. यशवंतरावांनी भाषण सुरू केले ....
' पिढ्यानपिढ्या आपण रहात असलेली गावे सोडून जात असताना, आपली कुलदैवते, वास्तू, आपण लावलेली झाडे, त्या भोवतालच्या वातावरणात रमलेले आपले मन काय म्हणत असेल याचा विचार केला की मन कष्टी होते. आपल्याला नवीन जागा मिळेल, जमिनी मिळतील, घरांची भरपाई मिळेल. परंतु पिढ्यानपिढ्यांच्या सहवासानंतर आपली मातृभूमी सोडून जाताना तुम्हाला होणा-या वेदना मी समजू शकतो.' वातावरण भावविवश झाले. वृद्ध शेतक-यांचे डोळे पाणावले. यशवंतराव बोलत होते. ' नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी तुम्ही मंडळी मोठा त्याग करीत आहात, याची आम्हाला जाणीव आहे. तुमचे पुनर्वसन ही आमची जबाबदारी आहे.'
एका सरकारचा प्रमुख आपल्याशी बोलतोय असे लोकांना वाटलेच नाही. आपली वेदना जाणणारा आपल्याच घरातील कोणी थोरला भाऊ आपले सांत्वन करतोय असे लोकांना वाटले आणि सभेत गोंधळ घालण्याच्या तयारीने आलेले लोक नवीन आशा मनात वागवत घरी गेले.