थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन

Thorle Saheb punya smruti
थोरले साहेब

 पुण्यस्मृती अभिवादन

लेखक : बाळासाहेब संकपाळ
--------------------------------- 

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत

१५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर २६ जानेवारी १९५० पासून स्विकारलेली प्रजासत्ताक राज्य पध्दती अवलंबत राज्याराज्यातून देशाचा विकास आपण अनुभवत आलो. स्वातंत्र्या नंतरच्या वाटचालीत नियोजनाच्या माध्यमातून संशोधन व नवनिर्मीतीतून सामाजीक, सांस्कृतीक, कृषी, सेवाक्षेत्रांत आपण आघाडी घेतली. शासन, सामाजीक संस्था, शैक्षणिक, सांस्कृतीक व साहित्यीक व्यासपीठाच्या माध्यमातून बौध्दीक विचारांत भर घालत सामाजीक समभाव वृध्दींगत केला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरची विकासाची घोडदौड सातत्याने २५-३० वर्षे कार्यरत ठेवू शकलो. या काळांत अनुभवलेल्या आदर्श व समाजाभिमुख कार्यपध्दतीत राज्यांत व देशांत आदर्शवत नेतृत्व म्हणून मान्यता पावलेले स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचा राजकीय कार्यकाळ हा सुवर्णकाळ गणला गेला. स्वातंत्र्य प्राप्तीच्या पहिल्या २५-३० वर्षाच्या राजकीय व सामाजीक वाटचालीतील सातत्य राखले. राज्यकर्ते व समाजपरिवर्तनांत आघाडीवर असलेल्या सेवाभावी, सहकारी शैक्षणिक, सांस्कृतीक संस्थामधील नेतृत्वाने आपल्या महत्वकांक्षेच्या हव्यासापोटी राज्य व देश प्रगतीच्या संकल्पनेला सोयीनुसार क्रम देण्यामुळे सामाजीक व राजकीय वाटचालीत अप्रीय प्रवृत्ती वाढत गेल्या. २०व्या शतकांत स्वातंत्र्य संग्रामाच्या यशस्वीते बरोबरच सामाजीक, वैज्ञानिक व राजकीय समाजाभिमुख केलेल्या प्रगतीचा विसर पडत गेला. परिणामी विज्ञानयुग म्हणून स्वागत केलेल्या २१व्या शतकातील प्रवेशापर्यंत समाजजिवन व राजकीय जीवन विकृत झाल्याचा अनुभव राज्य व देश पातळीवर प्रकर्षाने जाणवू लागला.

आज जागतीक स्थरावर स्वार्थ, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीय व धार्मिक तणाव, वैर वाढून माणसा माणसातील सामाजीक, सांस्कृतीक, धार्मीक व राजकीय नितीमत्ता लोप पावल्याचे दुर्दैवी वास्तव आपण अनुभवत आहोत.

अशा अप्रीय सामाजीक परिस्थीतीत अलिकडे दिवसेदिवस भर पडण्याचे सातत्य अखंड सुरु आहे. २१व्या शतकाचे पहिले दशक संपवणा-या वर्षात राज्य व देश असंख्य घोटाळ्याच्या संशयांत चाचपडत आहे.

प्राप्तपरिस्थितीत सर्वच स्थरावर आपण पुर्ववत प्रगतीच्या व सेवाभावी वृत्तीला अंगीकारुन अनुभवलेल्या सुवर्णकाळाचा प्रारंभ करुन उगवत्या पीढीला सुसह्य जिवनाचा लाभ व देश विकासाचा मार्ग देणार आहोत कि, नाही ? द्यायचा असेल तर कोणता कार्यकाळ आदर्शवत मानून परिवर्तनांत यश मिळवायचे हा प्रश्न समोर आहे.

या समस्येचा शोधबुध्दीने विचार करताना मनांत विचार आला कि, ज्यांच्या सामाजीक व राजकीय जिवनाला आम्ही आदर्श कार्यकाळ मानला त्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना प्रचलीत परिस्थीतीतून परिवर्तन प्राप्तकरण्याकरिता काय अभिप्रेत असावे ? याच कल्पनेतून आपल्या प्रचलीत समस्यांच्या निवारणाकरिता स्व. यशवंतरावजींनी काय मार्गदर्शन केले असावे ? असे मार्गदर्शन प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. याच विचाराने आजच्या कार्यरत समाजकर्त्याकडे व विद्यार्थी आणि तरुण पीढीला प्रगतीशील राज्य व देशातील समाजजिवन सुसह्य करण्याच्या दिपस्थंभाचा निर्देश करावा हा प्रामाणिक लेखन प्रपंच राज्यातील भावी पीढीकरिता सादर करत आहे. याच बरोबर हा लेखन हेतू साध्य करण्याकरिता राज्यभर व्यापक प्रमाणांत प्रबोधन कार्य सुरु करण्याचा मानस आहे. राज्यातील सांस्कृतिक मुल्यांच्या संस्कारातून या उपक्रमाला नव्या पीढीकडून प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.


अर्पण

आपल्या संस्कारातून यशस्वी जीवनाची वाट दाखवणा-या व आपल्या सहिष्णु, धार्मीक, समता, परोपकारी, विवेक व विचारांच्या अंमलबजावणीने वंदनीय झालेल्या संपूर्ण “विठाबाळा” कुटूंबाला प्रतिष्ठा मिळवून देणा-या माझे स्व. आजोबा आबा, स्व. आजी, माझे पीताजी दिवंगत आण्णा व आई आणि बुवादादा, ज्ञानू भाऊ खाशा बापू, मारुती आप्पा, बंडूदादा व रामूबापू, थोरली आई रकमाबाई, मुक्ताकाकी, पुतळाताई, थोरलीआई तानूबाई, गंगाकाकी आम्हा भावंडातून अपुरा प्रवास सोडून गेलेली सर्व भावंडं यांना व सर्वांवर प्रेम करणा-या आमच्या आत्यांना आणि ज्यांच्या आदर्श सामाजीक व राजकीय कार्यपध्दतीचा आश्रय घेवून आजवर यशस्वी वाटचाल करु शकलो त्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस अर्पण.