समाजाने त्यांचे ऋण मानले पाहिजे !
समाजासाठी आयुष्य वेचणा-या थोर कार्यकर्त्यांविषयी यशवंतरावांना खूप आदर वाटत होता. डॉ. दादासाहेब घोगरे हे धुळे जिल्ह्यातील असेच एक समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी १९५६ साली धुळ्यात पहिले कॉलेज सुरू केले. या कॉलेजच्या मंजुरीसाठी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांनी भरपूर सहकार्य केले होते.
त्यानंतर काही वर्षांनी पुण्यात गांधी प्रायमरी ट्रेनिंग कॉलेजच्या इमारतीचा उदघाटन समारंभ यशवंतरावांच्या शुभहस्ते झाला. मुख्यमंत्री आल्यामुळे साहजिकच कार्यक्रमाला खूप गर्दी होती. दादासाहेब देखील जनसमुदायात हजर होते. व्यासपीठावर शंभर - सव्वाशे पुढारी बसले होते. दादासाहेबांना प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. ते साध्या कार्यकर्त्याप्रमाणे सामान्य माणासांच्या गर्दीत बसून कार्यक्रम पहात होते, पण साहेबांच्या चाणाक्ष नजरेने दादासाहेबांना हेरले. इतक्यात आयोजकांनी यशवंतरावांना भाषण करण्याची विनंती केली. आपल्या भाषणात यशवंतरावांनी थोर समाजसेवक म्हणून म. फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबरच खानदेशचे डॉ. दादासाहेब घोगरे यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आणि पुढे म्हणाले, ' आजच्या या समारंभात डॉ. दादासाहेब घोगरे हजर असूनही त्यांची दखल कोणी घेऊ नये हे आश्चर्य आहे. दादासाहेबांसारखी माणसे निष्ठेने, श्रद्धेने व त्यागाने समाजाच्या हितासाठी काम करीत असतात. त्यांना मानमरातबाची अपेक्षा नसते व त्याची ते पर्वाही करीत नाहीत. समाज कोणाच्या मागे असतो, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. असे असले तरी समाजाने अशा कार्यकर्त्यांचे ऋण मानले पाहिजे, नव्हे ते समाजाचे कर्तव्यच आहे.'
यशवंतरावांच्या या उदगारांनी आयोजक ओशाळले. गर्दीमध्ये दादासाहेबांना शोधू लागले. खरेतर समारंभ सुरू होण्यापूर्वी यशवंतरावांची व दादासाहेबांची भेट झाली नव्हती. असे असूनही यशवंतरावांनी थोर समाजसेवकांच्या बरोबर आपले नाव घेतले, याविषयीची कृतज्ञता कायम त्यांच्या मनात राहिली. त्या एका वाक्याने यशवंतरावांनी दादासाहेबांना कायमचे जिंकले.