भूमिका

Bhumika
भूमिका

लेखक : यशवंतराव चव्हाण
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

प्रास्ताविक

'युगांतर' नंतर जवळजवळ दहा वर्षांनी हा माझा तिसरा भाषणसंग्रह प्रसिद्ध होत आहे. मुख्यत: १९६६ ते १९७९ या कालखंडातील काही निवडक भाषणे यात समाविष्ट आहेत. यामध्ये भाषणांबरोबर काही मुलाखतींवर आधारलेले आणि स्वतंत्र असे दुसरे लेखही आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी विविध विषयांवर व्यक्त केलेले विचार कुठेतरी एकत्रित नोंद झालेले असावेत, हा या पुस्तकाच्या प्रसिद्धीकरणाच्या पाठीमागचा हेतू आहे.

वाचकांच्या सोयीसाठी ही भाषणे किंवा या मुलाखती जशाच्या तशा स्वरूपात शब्दश: न देता प्रकाशकांनी माझ्या संमतीने त्यांचे लेखस्वरूपात रूपांतर आणि संपादन केले आहे.

गेले अर्धशतक मी एका राजकीय पक्षाचा सभासद म्हणून सातत्याने काम करीत आलो आहे व बोलत आहे. या कालखंडातील माझी १९५६ नंतरची काही भाषणे व लेख 'युगांतर' व 'सह्याद्रीचे वारे' यांत प्रसिद्ध झालेली आहेत.

राजकारणाच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात कुठे तरी निवांत बसून आपले विचार कागदावर उतरवण्यास आवश्यक ती उसंत मिळत नाही. तेव्हा प्रसिद्ध झालेले भाषणांचे वृत्तांत, इतर टिपणं व सहजपणे उपलब्ध झालेली भाषणांची टेप-मुद्रितं यांच्या मदतीने हे लेखन तयार केले आहे.

यांतील एक भाषण १९६१ साली 'हेराल्ड लास्की इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल सायन्स' अहमदाबाद, येथे दिलेले आहे. ते प्रसिद्ध करण्याचे राहून गेले होते. ते मला महत्त्वाचे वाटले, म्हणून 'संसदीय लोकशाही आणि प्रत्यक्ष आंदोलन' या शीर्षकाखाली या पुस्तकात प्रसिद्ध होत आहे. अहमदाबादच्या लास्की इन्स्टिट्यूटने या भाषणाची पुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेच्या काही प्रती माझ्याकडे सापडल्या, हा लेख त्या पुस्तिकेचेच भाषांतर आहे.

याच्याशिवाय बहुतेक सर्व भाषणे १९६६ ते १९७९ या चौदा वर्षांच्या पल्लेदार कालखंडातील आहेत. या काळात माझ्या राजकीय जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. मी संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि शेवटी विरोधी पक्षाचा नेता व पार्लमेंटचा सभासद या नात्याने केलेली ही भाषणे आहेत. स्थानांमध्ये आणि कालामध्ये विविधता असली, तरी माझ्या मते या भाषणांमध्ये वैचारिक दृष्टीने अभ्यासकाला एकसूत्रता आढळून येईल, अशी मला आशा आहे.