कथारुप यशवंतराव- आपण अधिक ' डावं ' होऊया !

 आपण अधिक ' डावं ' होऊया  !   
   
यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट. राहुरी ( जि. अहमदनगर ) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे शिबीर होते. त्यावेळी नगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य असणारे बाळासाहेब विखे- पाटील या शिबीराला निमंत्रित म्हणून हजर होते. कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आणि शिबीरासाठी मुख्यमंत्री चव्हाणसाहेब आले होते. शिबीरात अनेक ठराव मांडण्यात आले. राजकीय ठराव कार्यकारिणीने मंजूर करण्यापूर्वी चव्हाणसाहेबांनी त्यावर नजर फिरवली. साहेब म्हणाले, ' ठराव अप्रतिम आहे. त्यात नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. फक्त एक छोटीशी दुरुस्ती सुचवावीशी वाटते. ती सर्वांना मान्य असेल तर स्वीकारावी.'

पदाधिका-यांनी विचारलं , ' काही चुकलंय का साहेब ?'

' काही चुकलं नाही. फक्त छोटीशी दुरुस्ती आहे. ठरावात म्हटलं आहे की जनसंघाची शक्ती वाढतेय. याचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने अधिक ' उजवं ' झालं पाहिजे. यामध्ये फक्त एका शब्दाची दुरुस्ती आहे. काँग्रेसने ' उजव ' ऐवजी ' डावं ' व्हायला पाहिजे असं मी सुचवतो.'

चव्हाण साहेबांनी सुचविलेली ही एका शब्दाची दुरुस्ती सर्वांच्या वर्मी बसली. अक्षरश: एका शब्दात त्यांनी आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगितलं. जर काँग्रेसचे कार्यकर्ते गरीबांच्या व समाजाच्या अधिक जवळ गेले आणि त्यांनी पुरोगामी विचारांचा प्रसार केला तर जातीयवादी शक्ती वाढणारच नाहीत असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. साहेबांनी सुचविलेल्या दुरुस्तीसह तो ठराव एकमताने मंजूर झाला. तोच ठराव खुल्या अधिवेशनातही एकमताने मंजूर झाला.

या प्रसंगाचे साक्षीदार असणा-या बाळासाहेब विखे पाटील यांनीच ही आठवण सांगितली आहे.