कथारुप यशवंतराव-अखेरचा प्रवास

अखेरचा प्रवास

लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. यशवंतराव सातारा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार होते. इंदिराजींच्या हत्येमुळे राजीव गांधी सैरभैर झाले होते व त्यांना यशवंतरावांचे मार्गदर्शन हवे होते. निवडणूक जिंकून ' पुनश्च हरिओम ' करण्याचे स्वप्न यशवंतराव पहात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एकाकी अवस्थेत दिवस कंठणा-या यशवंतरावांना आजाराने घेरले.

२१ नोव्हेंबर १९८४ ची सकाळ उगवली तीच मुळी एक उदास गारवा घेवून. यशवंतरावांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटू लागले. संध्याकाळी त्यांना भेटण्यासाठी श्री. मदन भोसले आपल्या मित्रांसह आले. साहेबांच्या नोकराने- गंगारामने त्यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले पण यशवंतरावांनी सर्वांना आत पाठवायला सांगितले. मदनदादांनी या अखेरच्या दिवसांत साहेबांची मनोभावे शुश्रुषा केली होती. साहेबांचा चेहरा व एकूण अवस्था पाहून मदनदादांनी दिल्लीत जमलेल्या प्रमुख मराठी नेत्यांना निरोप दिला.

एन. के. पी. साळवे, वसंतदादा पाटील आदी नेत्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. पण साहेबांची तब्येत बिघडतच गेली. २३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून गेले. त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या मात्र साहेबांची तब्येत खालावतच गेली. २५ नोव्हेंबरला सायंकाळनंतर ते अत्यवस्थ झाले आणि पाहता पाहता जे जग सोडून गेले.

हिमालयाच्या मदतीसाठी धावून गेलेला सह्याद्री उत्तरेत धारातीर्थी पडला. कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर सुरू झालेला हा प्रवास यमुनेकाठी संपला. आता उरल्या आहेत त्या या रोमहर्षक प्रवासाच्या अस्विस्मरणीय आठवणी !