हे थांबले पाहिजे !
प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. लोकशाही राष्ट्रात प्रसारमाध्यमांची भूमिका खरोखरच महत्त्वाची असते. जनतेच्या समस्या काय आहेत, हे राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे आणि राज्यकर्ते जनतेसाठी काय करीत आहेत हे जनतेला सांगणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. अन्यायाला वाचा फोडणे हे माध्यमांचे कर्तव्य असते पण जेव्हा सत्ताधारी आणि पत्रकार यांची अभद्र युती होते तेव्हा जनता बेवारस होते. पत्रकार आणि सत्ताधारी व्यक्ती एकमेकांच्या नको इतके जवळ आले की त्यामुळे राज्यकर्त्यांचा बौद्धिक व पत्रकारांचा नैतिक -हास होण्याची दाट शक्यता असते.
राजकीय दूरदृष्टी लाभलेल्या यशवंतरावांना याची जाणीव होती, म्हणूनच अनेक पत्रकार त्यांचे मित्र असले तरीही त्यांनी सरकार चालविताना जाणीवपूर्वक विशिष्ट अंतर राखले . पण यशवंतरावांच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री पत्रकारांचे फार लाड करीत असत. काही पत्रकार तर मुंबई त्या मंत्र्यांच्या बंगल्यावर राहतात असे साहेबांना समजले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत साहेबांनी कोणाचेही नाव न घेता हा विषय काढला. पत्रकारांना मंत्र्यांनी बंगल्यावर ठेवून घेणे गैर असल्याचे साहेबांनी सूचित केले. संबंधित मंत्री बोध घेतील असे साहेबांना वाटले, पण तसे घडले नाही. त्या मंत्र्याने साहेबांच्या सूचनांची दखलच घेतली नाही. पत्रकारांचे मुक्काम सुरूच राहिले. शेवटी मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत साहेबांनी संबंधित मंत्र्याला सर्वांसमक्ष खडसावत ताकीद दिली. ' हे प्रकार थांबले नाहीत, तर मंत्रिमंडळात एकतर तुम्ही रहाल किंवा मी ! ' असे साहेबांनी सुनावले.
एरवी शांत स्वभावाच्या यशवंतरावांमध्ये लपलेला कठोर प्रशासक इथे दिसून येतो