ऋणानुबंध

Runanubandh


ऋणानुबंंध

लेखक : यशवंतराव चव्हाण
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

अनुबंध

'ऋणानुबंध' १९७९ साली प्रसिद्ध झालं. त्याची पहिली आवृत्ती '८२ साली संपली, तेव्हा 'दुसरी आवृत्ती काढू या', असं मी यशवंतरावांना म्हटलं, त्यांनी लगेच मान्यता दिली. परंतु, 'पहिल्या आवृत्तीत काही मुद्रणदोष, तर काही फॅक्च्युअल अपुरेपणा राहिला आहे, तो दुरुस्त करून छापू या', असं त्यांनी सुचवलं.

यशवंतरावांनी आत्मचरित्र लिहावं, अशी अनेकांप्रमाणे माझीही फार वर्षांची इच्छा होती. पण त्या वेळी मला यश आलं नाही. 'ऋणानुबंध'च्या वेळी त्यांच्याशी जुळलेले स्नेहाचे धागे 'भूमिका' पुस्तकाच्या वेळी दृढ झाले. संधी मिळेल तेव्हा आत्मचरित्राबाबत मी आग्रह करीत असे. अखेर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन 'कृष्णाकांठ' हा आत्मचरित्राचा पहिला भाग एप्रिल '८३ मध्ये माझ्या हाती सुपूर्त केला. साहजिकच आत्मचरित्रास प्राधान्य द्यावं लागल्यानं 'ऋणानुबंध'ची नवी आवृत्ती काढण्याचं मागं पडलं.

मार्च '८४ मध्ये त्यांनी 'ऋणानुबंध'ची दुसरी आवृत्ती काढण्याबद्दल मला सांगितलं आणि छापील प्रतीवरच आवश्यक त्या दुरुस्त्याही लिहून दिल्या. या नव्या आवृत्तीत त्या सर्व केल्या आहेत.

दरम्यान यशवंतरावांच्या जीवनात दोन दु:खद घटना घडल्या. त्यांचा पुतण्या डॉ. विक्रम चव्हाण यांचं अपघाती निधन आणि पत्नी सौ. वेणूताईंचा अंत. या दोन प्रिय व्यक्तींच्या निधनामुळं यशवंतराव व्यथित असत. अशा विमनस्क परिस्थितीतही त्यांनी आत्मचरित्राचा दुसरा खंड 'सागरतीर' पुरा करावा, असे मी अधूनमधून सुचवीत असे. तेही हो म्हणत.

आत्मचरित्राच्या दुस-या संकल्पित खंडाबद्दल त्यांनी मला दिलेलं ठोस आश्वासन न पाळताच ते निघून गेले, हे दु:ख तर आहेच; पण आमच्या जुळलेल्या स्नेहसंबंधांच्या ब-याच सुखद आठवणीही त्यांनी मागे ठेवल्या आहेत, त्याही जन्मभर पुरणा-या आहेत.

१० एप्रिल,  १९८६
सर्जेराव घोरपडे