लोकनेते यशवंतराव चव्हाण
लेखक : अनिल चव्हाण
--------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
लेखक मनोगत
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण झाली. या प्रदीर्घ कालखंडात महाराष्ट्राने औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड मोठी प्रगती केली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात यशवंतराव चव्हाणसाहेबांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका विचारात घेऊन त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' म्हणून गौरविण्यात येते. विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह महाराष्ट्र राज्य चव्हाणसाहेबांच्या योगदानातूनच निर्माण झाले.
सन २०१२ या सालात यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. महाराष्ट्र राज्याने 'सहकार वर्ष' म्हणून २०१२ हे साल जाहीर केले. सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात व देशात उमटविला. विधायक दृष्टिकोन ठेवून तत्त्वनिष्ठ राजकारणाचा आदर्श घालून दिला.
यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समग्र वाटचालीचा आढावा. 'लोकनेते: यशवंतराव चव्हाण' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. यासाठी अनेक संदर्भग्रंथ, पुस्तके चाळण्यात आली. यशवंतरावांचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राजकीय वाटचाल, विचारसंपदा, महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील योगदान या सर्व बाबींचा तपशीलवार आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. इ.स. २०१२ मध्येच चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पुस्तक प्रकाशित होत आहे. समाजाच्या सर्वच थरातील मंडळीकडून या पुस्तकाचे चांगल्याप्रकारे स्वागत होईल याची खात्री वाटते.
पुस्तकाच्या निर्मितीत अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. श्री. गुरुदत्त कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर श्री. रामचंद्र जी. कुंभार व माझे मावसबंधू श्री. विनोद रा. बागडे (निपाणी) यांचे या पुस्तकाच्या छपाईसाठी बहुमोल आर्थिक सहकार्य लाभले. माझे मित्र रविंद्र मोरे, निवास डोईफोडे, अशोक पाटील, सुधाकर डोणोलीकर, नगरसेवक रामूगडे यांचीही वरचेवर बहुमोल साथ मिळत गेली. माझी पत्नी सौ. जयश्री अ. चव्हाण यांनी प्रकाशनाची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडली. श्रुती ग्राफिक्सचे राजू सुढाळ यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ व अंतरंग आकर्षकरित्या करुन दिले. ख्यातनाम विचारवंत व टाईम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार डॉ. सुभाष के. देसाई यानी पुस्तकास प्रस्तावना देऊन पुस्तकाचे योग्य परिक्षण केले. शिव इंप्रेशन यांनी पुस्तकाची छपाई उत्कृष्टरित्या, वेळेत करुन दिली. अनेक ज्ञात-अज्ञातांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहकार्यातून हे पुस्तक पूर्ण झाले. या सर्वांचे मन:पूर्वक
आभार !
अनिल चव्हाण
अनिल ई. चव्हाण