कथारुप यशवंतराव- तिळगूळ घ्या, गोड बोला !!

तिळगूळ घ्या, गोड बोला  !!

यशवंतरावांचे भाषण म्हणजे बुद्धिमत्ता, ममता आणि कल्पकता यांचा अनोखा संगम असायचा. पर्वताने पठाराशी बोलावे तसे ते उपस्थित जनसमुदायाशी बोलायचे. त्यांच्या सभांना लोकांची प्रचंड गर्दी व्हायची.

एकदा नाशिकला त्यांची प्रचारसभा रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आलेली होती. दिवसभरात दहा - बारा सभा आटोपून ते शेवटच्या सभेसाठी नाशिकला येणार होते. तो दिवस होता १३ जानेवारी. गोल्फ क्लबसमोरील भव्य मैदानावर सभा होती. रात्री नऊच्या सभेसाठी सायंकाळी सात वाजल्यापासूनच लोक सभास्थळी येऊ लागले. नऊ वाजेपर्यंत सुमारे पन्नास हजार लोक जमले. आपल्या आवडत्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक आतुर झाले होते. सभेची वेळ झाली. पण यशवंतरावांचे आगमन झाले नव्हते. त्यांना उशीर होणार होता, पण नक्की किती उशीर होणार होता हे कोणालाच माहित नव्हते. दहा वाजून गेले. अकरा वाजले. शेवटी रात्रीचे बारा वाजून गेले तरी यशवंतराव आले नाहीत. इतर छोट्या मोठ्या नेत्यांची भाषणे सुरू होती. यशवंतरावांना यायला उशीर होणार आहे, पण ते नक्की येणार आहेत, अशा सूचना अधूनमधून दिल्या जात होत्या. एवढा उशीर होऊनही लोक हलायला तयार नव्हते. रात्री सव्वाबारा वाजता यशवंतराव आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अतिशय उत्साहात ते भरभर स्टेजवर आले. दिवसभरात अनेक सभा घेऊनही आणि खूप प्रवास करूनही त्यांचा चेहरा प्रसन्न आणि हसरा होता. ते भाषण करण्यासाठी उठले. माईकजवळ आले व सर्व जनसमुदायाला नम्रपणे हात जोडून म्हणाले, ' तिळगूळ घ्या व गोड गोड बोला ' ( कारण एव्हाना १४ जानेवारी हा दिवस सुरू झाला होता व त्यादिवशी संक्रांत होती. )

हे वाक्य ऐकल्याबरोबर पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला व त्यानंतर सुमारे चाळीस मिनिटे सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याचे भाषण शांतपणे ऐकले. अचूक वेळ साधून यशवंतराव पहिल्याच वाक्यात श्रोत्यांना जिंकायचे ते असे  !