कथारुप यशवंतराव-आपण निश्चिंत असा !

आपण निश्चिंत असा  !     
   
गो. नी. दांडेकर उर्फ आप्पा हे एक थोर कादंबरीकार, साहित्यिक म्हणून महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांनी अनेक सुंदर ऐतिहासिक कादंब-या लिहिल्या. पंजाब राज्यात सतलज नदीवर बांधलेल्या भाक्र- नानगल धरणाच्या उभारणीवर आधारित एक कादंबरी लिहिण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी दांडेकर प्रत्यक्षात पंजाबात जाऊन त्या धरणाच्या परिसरात फिरले. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ' आम्ही भगीरथाचे पुत्र ' या कादंबरीची एक प्रत यशवंतरावांना देण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले. तेथील शिपायाजवळ त्यांनी चिठ्ठीवर आपले नाव आणि काम लिहून दिले. थोड्या वेळाने शिपाई बाहेर येऊन म्हणाला, ' अहो पुस्तकवाले, चला.' आत गेल्यावर गोनीदांना यशवंतराव म्हणाले, ' या... ! काय आणलेत ? बसा.' यावर दांडेकरांनी त्यांना कादंबरी दिली. साहेबांनी कादंबरी हातात पडताच ती हाताळली व म्हणाले, ' अरे व्वा, पंजाबात गेला होतात वाटतं..., तिथं किती दिवस राहिलात ?' मग दांडेकरांनी कादंबरीची जन्मकथा सांगितली. यशवंतरावांनी ती कुतूहलपूर्वक व लक्ष देऊन ऐकली. शेवटी दांडेकर म्हणाले, ' सवड होईल तेव्हा पुस्तक वाचून एखादी ओळ लिहाल ?'

यावर साहेब म्हणाले, ' अवश्य ! आपण निश्चिंत असा, आणखी काय ?'

' आणखी असे की एकदा मला कोयना धरणाचे काम लक्षपूर्वक पाहायचे आहे.'

' जरूर. केव्हा जाता तिकडं ? जाण्यापूर्वी मला लिहा, न विसरता.'

या प्रेमळ सूचनेनंतर दांडेकर खूष होऊन बाहेर पडले. त्यानंतर सुमारे एका वर्षानंतर कोयनानगर परिसरातील एका शाळेच्या वार्षिक समारंभानिमित्त कोयनानगर जाण्याची संधी दांडेकरांना मिळाली. त्यांनी यशवंतरावांना पत्राने तसे कळविले. त्यानंतर चौथ्या दिवशी दांडेकरांना कोयनानगरच्या कार्यकारी अभियंत्याचे पत्र आले. त्यात लिहिले होते, ' कृपया आपण किती तारखेला येणार आहात ते कळवा, म्हणजे आपल्या निवासाची व धरण पाहण्याची व्यवस्था करता येईल. ' त्याप्रमाणे दांडेकरांनी भेटीचा दिनांक व वेळ सांगितली. पुढे त्या संबंधित शाळेतील कार्यक्रम संपण्यापूर्वीच धरणाच्या अभियंत्याची अलिशान गाडी शाळेत पोहोचली. समारंभ संपल्यानंतर त्यांना त्या गाडीने कोयनानगरला नेण्यात आले व धरणाचा संपूर्ण परिसर प्रत्यक्ष हिंडून दाखविण्यात आला. एक वर्षापूर्वी दिलेला शब्द यशवंतरावांनी तंतोतंत पाळला होता. दांडेकर आप्पांच्या मनात कृतज्ञता दाटून आली.