कथारुप यशवंतराव-कधीतरी मीही ' माजी ' होणार आहे !

कधीतरी मीही ' माजी ' होणार आहे !     
     
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व धोक्यात आले. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावले. अगोदरचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्या कारभाराविषयी जनतेत प्रचंड नाराजी होती. संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच  यशवंतरावांनी सेनेचा विस्तार, हवाई दलाचे आधुनिकीकरण, संरक्षण सामग्रीचे पुरेसे उत्पादन आणि वाहतुकीच्या सुविधांची निर्मिती ही चतु:सूत्री समोर ठेवून काम सुरू केले. एकदा चिनी आक्रमणासंबंधी संसदेत चर्चा सुरू असताना काही सदस्य म्हणाले, ' सरकार नेत्रहीन आहे. गुप्तचर यंत्रणा ढिसाळ आहे, मोक्याच्या ठिकाणी विमानतळे नाहीत.'

अर्थातच या टीकेचा रोख माजी संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्यावर होता. कारण यशवंतरावांनी संरक्षणमंत्रीपदाचा कारभार स्वीकारून काही दिवसच उलटले होते. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे खापर कृष्ण मेनन यांच्यावर फोडणे त्यांना सहज शक्य होते. कारण त्या चुकांची जबाबदारी यशवंतरावाची नव्हतीच. पण दुस-याला दोष देणे हा यशवंतरावांचा स्वभाव नव्हता. कृष्ण मेनन यांच्याविषयी टिप्पणी करण्याचे त्यांनी टाळले व स्मितहास्य करीत ते म्हणाले, ' मीही कधीतरी ' माजी ' ( मंत्री ) होणार आहे. एकमेकांचे उणे काढण्यासारखे हे आहे. काही गोष्टी आपल्याही जीवावर बेतू शकतात हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपला उत्तराधिकारी आला की आपणही ' माजी ' होणार आहोत ,' या वाक्यावर सभागृहात हास्याची लाट पसरली.