कथारुप यशवंतराव-मी तुमचा भाऊ आहे !

मी तुमचा भाऊ आहे  ! 
     
कृतज्ञता हा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव होता. ' गावात गेल्यानंतर मोठमोठ्या हवेल्या पाहिल्या तरी ज्या वेशीतून गावात शिरलो ती वेस कधी विसरायची नसते ' असे त्यांनीच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे. त्यांच्या कृतज्ञतेचे दर्शन घडविणारा हा प्रसंग.

१९६२ साली पंतप्रधान पं. नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री पद स्वीकारण्यासाठी फोन करून बोलावून घेतले. देशाच्या इतिहासातील कठीण काळात पंतप्रधानांच्या हाकेला ओ देवून यशवंतराव दिल्लीला गेले. घटनेनुसार संरक्षणमंत्री पद स्वीकारल्यापासून सहा महिन्याच्या आत त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य होणे बंधनकारक होते. त्याचवेळी नाशिकचे खासदार देशपांडे यांच्या निधनामुळे नाशिक लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होऊ घातली होती. यशवंतरावांनी तेथूनच निवडणूक लढवायचे ठरवले. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपला उमेदवार उभा न करता यशवंतरावांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यशवंतराव नाशिकमध्ये आले तेव्हा निवडणूक निर्णय अधिका-याच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी त्यांनी दिवंगत खासदार देशपांडे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पत्नी राधाबाई देशपांडे यांची भेट घेतली व म्हणाले, ' ताई, मी तुमचा भाऊ आहे. काही अडचण आल्यास अवश्य सांगा.'

या छोट्या कृतीतून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे दर्शन तर घडतेच, पण त्यांच्या कर्तृत्वाइतकीच त्यांच्या संस्काराची उंचीसुद्धा सह्याद्रीएवढी आहे हेही स्पष्ट झाले.