कथारुप यशवंतराव-रक्ताने लिहिलेले महाकाव्य !

रक्ताने लिहिलेले महाकाव्य  !        
     
१९६२ साली यशवंतराव दिल्लीला गेले . संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. चीनने युद्धबंदी घोषित केली. पण १९६५ साली पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली. पण यावेळी भारत गाफील नव्हता. यशवंतरावांनी तीन वर्षे अथक मेहनत घेऊन संरक्षण खात्याची केलेली पायाभरणी कामाला आली. भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. अर्थात या युद्धात अनेक भारतीय जवानही शहीद झाले. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांविषयी यशवंतराव खूप हळवे होते.

पाकिस्तानविरुद्धचे युद्ध चालू असताना दिल्लीच्या लाल किल्ल्यात एका कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहीदांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कवी संमेलनात श्रीमती रमा जैन यांनी मेजर जनरल चौधरी यांना शंभराच्या नोटांची माळ घातली. त्या रात्री जमलेल्या प्रचंड समुदायापुढे भाषण करताना यशवंतराव म्हणाले, ' मी कोणी कवी नाही की महाकवी नाही. आजच्या प्रसंगी बोलण्याचा मला अधिकार नाही, पण आज सीमा क्षेत्रातील रणांगणावर आपल्या जवानांनी आणि शहीदांनी रक्ताने जे महाकाव्य लिहिले आहे, त्यांना मी वंदन करतो.'

यशवंतरावांच्या या वाक्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सतत पाच मिनिटे टाळ्या वाजत होत्या. एका वाक्यात सभा जिंकण्याची यशवंतरावांची स्वत: ची अशी खास पद्धत होती, तिचे दर्शन या भाषणातून घडले.