कथारुप यशवंतराव-प्रेमाने माणसे कायमची जोडली जातात

प्रेमाने माणसे कायमची जोडली जातात     

भाई माधवराव बागल यांनी सांगितलेली ही एक आठवण. यशवंतराव मुख्यमंत्री असताना वाईमध्ये केवलानंद स्मारक मंदिराचा उदघाटन समारंभ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी आयोजित केला होता. या समारंभास राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राज्यपाल श्री. श्रीप्रकाश उपस्थित होते.

शास्त्रीजींच्या आग्रहावरुन भाई माधवराव बागल सुद्धा या समांरभाला आले होते. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते व यशवंतरावांचे विरोधक होते. एक सामान्य नागरिक म्हणून ते या कार्यक्रमाला गेले होते. लांबच्या एका कोप-यात बसले होते. व्यासपीठावर सर्व मान्यवर स्थानापन्न झाले. यशवंतरावांचे लक्ष कसे गेले कोणास ठाऊक, पण त्यांनी भाई माधवरावांना पाहिले. त्यांनी लगेच तेथे उभ्या असलेल्या कलेक्टरला माधवरावांकडे पाठवून त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतले  व राष्ट्रपती डॉ. राजेंद्रबाबूंशी त्यांची मुद्दाम ओळख करून दिली. खरे म्हणजे या गोष्टीचे काहीच प्रयोजन नव्हते, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच साहेबांनी अनेकांची मने जिंकली होती.