कथारुप यशवंतराव-महिलांचा मान राखलाच पाहिजे !

महिलांचा मान राखलाच पाहिजे  !      
   
यशवंतराव मुख्यमंत्री असतानाचा हा प्रसंग. नागपूरला विधानसभेचे अधिवेशन चालू होते. अधिवेशन आता अंतिम टप्प्यात होते. एके दिवशी सर्व महिला आमदारांनी यशवंतरावांना आपल्या निवासस्थानी जेवायला बोलावले. हे जेवण दुपारी बारा वाजता ठेवले होते. यशवंतरावांचे काम त्यादिवशी साडेबारा वाजेपर्यंत उरकू शकले नाही. त्यांना काही महत्त्वाचे निवेदन विधानसभेत करायचे होते. निवेदन केल्यावर साहेब मारोतराव कन्नमवार यांना म्हणाले, ' मी महिलांच्या भोजन समारंभास उपस्थित राहून लगेच परत येतो.' कन्नमवार म्हणाले, ' आपण जेवण आटोपून अर्ध्या तासात असेंब्लीत कसे येऊ शकाल ? जेवणाच्या कार्यक्रमास न गेल्यास काय हरकत आहे ?'

साहेब म्हणाले , ' नाही नाही, हा महिलांचा कार्यक्रम आहे. मला त्यांचा मान राखलाच पाहिजे , मी लगेच जातो आणि वेळेवर परत येतो.'

साहेब गेले आणि सांगितल्याप्रमाणे बरोबर एक वाजायला तीन मिनिटे कमी असताना विधानसभेत येऊन पोचले. कन्नमवारांनी आश्चर्याने विचारले, ' एवढ्या लवकर आपले जेवण कसे आटोपले ?' साहेब म्हणाले, ' मी महिलांच्या बरोबर पाटावर बसलो घाईघाईने वरवर थोडा भात घेतला आणि त्यांची क्षमा मागून लगेच येथे आलो !'

कामाच्या व्यापात असतानासुद्धा यशवंतरावांनी आपला शब्द पाळला याचा महिला आमदारांना आनंद झाला.