... म्हणून मी ' मराठा ' वाचीत नाही ...!
संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन ऐन भरात आले होते. आचार्य अत्रे त्यांच्या ' मराठा ' तून सरकारवर व यशवंतरावांवर टीकेचा भडिमार करत होते. ब-याचदा ही टीका सभ्यतेच्या मर्यादा ओलांडीत असे. यशवंतराव मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत होते.
एकदा अत्र्यांनी ' मराठा ' दैनिकात यशवंतरावांवर अत्यंत जहाल टीका केली. दुस-या दिवशी कॉ. दत्ता पाटील यांनी सभागृहात याविषयी चर्चा उपस्थित केली. सभागृहात गदारोळ सुरू झाला. गोंधळ थांबेना, तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी यशवंतरावांच्या दिशेने हात करून त्यांना निवेदन करायला सांगितले. यशवंतराव उठले. सभागृहात शांतता पसरली. यशवंतराव म्हणाले, ' घराबाहेर ' , मोरूची मावशी ' , ' क-हेचे पाणी ', ' झेंडूची फुले ', ' साष्टांग नमस्कार ' अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिणारे आचार्य अत्रे, ' श्यामची आई ' सारखा अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित करणारे आचार्य अत्रे यांच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. त्यांची एक विशिष्ट प्रतिमा माझ्या पिढीच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून आजकाल मी ' मराठा ' वाचीत नसतो.' या मार्मिक टोल्याने सभागृह हास्यात बुडून गेले.