कथारुप यशवंतराव-जनता जनार्दन हाच माझा परमेश्वर !

जनता जनार्दन हाच माझा परमेश्वर !

सन १९५९ सालातील मे महिन्यातला हा प्रसंग. नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर थोर संत ह. भ. प. श्री. भगवानबाबा महाराज यांनी विठ्ठल - रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला होता. श्री. बाळासाहेब भारदे हे भगवानगडाचे ट्रस्टी होते. त्यांच्या आग्रहास्तव यशवंतराव या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बाबांचे हजारो भक्त आले होते. यशवंतरावांच्या हस्ते विठ्ठल - रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि भगवान विद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवली गेली. त्यानंतर मोठी सभा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात भगवानबाबा म्हणाले ,' यशवंतराव हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पांडुरंगाच्या कृपेने ते पृथ्वीराज चव्हाण व्हावेत.' टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. त्यानंतर बाबांनी पांडुरंगाच्या नैवेद्याची तरतूद यशवंतरावांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

बाबांच्या भाषणानंतर यशवंतराव भाषणासाठी उठले. ते म्हणाले, ' बाबांनी मला पृथ्वीराज चव्हाण व्हावे असा आशीर्वाद दिला. परंतु तो मला अपेक्षित नाही. या देशातून व जगातल्या अनेक देशातून राजे गेले. लोकशाहीमध्ये माझ्यासमोर असलेली जनता सर्वोच्च आहे. ही जनताच राजसत्तेची धनी आहे. जनताजनार्दन हाच माझा परमेश्वर आहे. एकवेळ मंदिरातील देव नैवेद्यावाचून उपाशी राहिला तरी चालेल, परंतु माझ्यासमोर बसलेली ही जनता उपाशी राहता कामा नये.'

यशवंतरावांना राजेशाहीपेक्षा लोकशाही अधिक प्रिय होती आणि देवाच्या भक्तीपेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची वाटत होती, हेच वरील प्रसंगावरून लक्षात येते.