मी न्यायबुद्धीने वागेन !
साथी एस. एम. जोशी हे महाराष्ट्राला लाभलेले एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कामगार, दलित, आदिवासी आणि इतर उपेक्षित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकारशी भांडत राहिले. यशवंतरावांना त्यांच्याविषयी नितांत आदर होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे एसेम व यशवंतराव यांच्यातील राजकीय मतभेद टोकाला गेले होते, तरी दोघांच्याही मनात एकमेकांविषयी तिळमात्र कटुता नव्हती.
१९५७ सालची विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली. जनमत काँग्रेसच्या विरोधात होते. प्रचारासाठी यशवंतराव जिथे जिथे जायचे तिथे काळ्या झेंड्यांनी त्यांचे स्वागत व्हायचे. काही ठिकाणी चपलांच्या माळादेखील लावलेल्या असायच्या. काही मत्सरी माणसे यशवंतरावांविषयी बेजबाबदारपणे बोलायची.
पुढे यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ज्यांनी आपली बदनामी केली त्यांच्याबद्दल यशवंतरावांनी मनात कसलीही कटुता बाळगली नाही. आपला तोल ढळू दिला नाही. एस. एम. जोशी विरोधी पक्षनेते झाल्यावर यशवंतरावांनी त्यांना चहाला बोलावले व सांगितले ,' आण्णा, मी आता काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री नाही. मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तेव्हा कधीही माझ्याकडे या. मी तुमचाच आहे. मी न्यायबुद्धीने राहण्याचा प्रयत्न करेन.'