कथारुप यशवंतराव-... मी दिलगिरी व्यक्त करतो !

... मी दिलगिरी व्यक्त करतो !
 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एस. एम. जोशींचे मोठे योगदान होते. १९५७ च्या विधासभा निवडणुकीत ते पुण्याच्या शुक्रवार पेठ मतदारसंघातून निवडून आले होते. या पेठेत वेश्याव्यवसाय करणा-या महिलांची संख्या जास्त होती. आपल्या प्रचार दौ-यात एसेम त्या महिलांनाही भेटले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक सत्शील नेते म्हणून त्या महिलांनीही  एसेम जोशींना मते दिली होती.

एकदा विधानसभेत एका विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे एक सदस्य उपहासाने म्हणाले, ' एसेम ' त्या महिलांच्या मतावरच निवडून आलेत ! ' सभागृहातील काही सदस्य कुत्सितपणे हसले. एसेम लगेच उठून उभे राहिले व म्हणाले, ' तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. त्या भगिनींनी मला मते दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या आपल्या समाजात पोट भरण्यासाठी त्यांना हा व्यवसाय करावा लागतो, याबद्दल मात्र मी शरमिंदा आहे.'

हा सगळा प्रसंग घडला तेव्हा यशवंतराव सभागृहात नव्हते. थोड्या वेळाने ते आले आणि त्यांना ही हकीकत कळाली. आपल्या पक्षाच्या एका सदस्याने असे बेजबाबदार आणि संवेदनाशून्य विधान करावे याचे त्यांना मनस्वी दु:ख झाले. त्यांनी त्या सदस्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि सभागृहाला उद्देशून ते म्हणाले, ' आत्ताच या ठिकाणी त्या सदस्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सभागृहाचा नेता म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो.' नंतर त्यांनी त्या सदस्याला कडक भाषेत समज दिली.

ही घटना लहान असली तरी त्यातून यशवंतरावांची संवेदनशीलता दिसून येते. स्वत: एसेम जोशी यांनीच ही आठवण नोंदवून ठेवली आहे.