कथारुप यशवंतराव-आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे

आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे

यशवंतरावांच्या राजकीय जीवनात त्यांना प्रथमपासूनच अधिकारपदाची जागा मिळत गेली. अडतीस वर्षांच्या त्यांच्या संसदीय राजकारणात जवळपास बत्तीस वर्षे ते सत्तेत होते. त्यामुळे ते सत्तालोलुप आहेत असे काही लोक म्हणत. या आरोपात काही तथ्य नव्हते. यशवंतराव काम करत गेले आणि त्यांना पदे मिळत गेली. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कधी वाममार्गाचा वापर केला नाही. पण विकास करायचा असेल तर त्यासाठी सत्ता हवी अशी त्यांची भूमिका होती. एकदा पत्रकार नरूभाऊ लिमयेंनी यशवंतरावांना विचारले, ' सत्तेसाठी अनेकदा तडजोडी कराव्या लागतात. एस. एम. जोशी, शेकापचे मोरे, कॉ. डांगे यांना सत्ता नसली तरी जनमानसात किंमत आहे. कारण ते तत्त्वासाठी अल्पमतात राहतात.'

यावर यशवंतराव म्हणाले,' तुम्ही म्हणता ते खरे आहे. त्यांना समाजात किंमत आहे. राजसत्तेवर अंकुश ठेवण्याइतपत त्यांचे महत्त्व आहे. ते राज्यकर्ते झाले नाहीत तरी त्यांचे काही नुकसान होणार नाही आणि राज्यकर्ता झाल्याशिवाय मी बहुजन समाजाला न्याय देऊ शकणार नाही. मी जातीयवादी नाही किंवा काही जातींचा द्वेष्टाही नाही, पण ज्या बहुजन समाजात मी जन्माला आलो, मोठा झालो त्यांना पुढे घेऊन जायचे असेल तर सत्ता गरजेची आहे. शेकडो वर्षांतून आत्ता कुठे बहुजन समाजाला विकासाचा मार्ग खुणावतो आहे आणि या विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.'