कथारुप यशवंतराव-हे मी वाचले आहे !

हे मी वाचले आहे !
 
यशवंतरावांनी आयुष्यभर काही छंद जोपासले, काही श्रद्धा जपल्या. वाचनाचा छंद त्यांनी कायम जपला. वेगवेगळ्या विषयासंबंधीचे आपले ज्ञान अद्ययावत् करण्यासाठी तर कधी साहित्यकृतींचा आस्वाद म्हणून ते वाचन करीत. अशा चौफेर वाचनामुळेच त्यांच्या भाषेला एक डौलदारपणा आला होता. एखाद्या साहित्यिकाला लाजवेल असा यशवंतरावांचा व्यासंग होता. पण या व्यासंगाचे प्रदर्शन त्यांनी कटाक्षाने टाळले. त्यांच्या सहज बोलण्यातून मात्र ते सारे संदर्भ जाणकाराला जाणवायचे.

ज्येष्ठ नेते कै. वसंतदादा पाटील यांनी सांगितलेली अशीच एक आठवण. एकदा मिरज संस्थानच्या राजेसाहेबांनी यशवंतरावांना चहाला बोलावले. राजांना वाचनाचा छंद होता आणि आपल्या बहुश्रुतपणाचा एक वेगळा अभिमानही होता. आपल्या सखोल व्यासंगाची यशवंतरावांना माहिती व्हावी म्हणून गप्पांच्या ओघात ते त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलू लागले. आपण किती पुस्तके वाचली याची एक प्रकारे यादीच ते सांगू लागले. ' अलिकडेच मी हे नवीन पुस्तक वाचले ' असे म्हणून ते यशवंतरावांकडे प्रतिसादासाठी पहात. पण गंमत म्हणजे यशवंतरावांनीही ते पुस्तक त्याही अगोदर वाचलेले असायचे आणि त्या पुस्तकाविषयी यशवंतरावांचे विश्लेषण अधिक सखोल असायचे. दोघांची अशी जुगलबंदी बराच वेळ चालली. राजांनी एखाद्या पुस्तकाचे नाव सांगावे आणि यशवंतरावांनी त्या ग्रंथाचे सार थोडक्यात सांगावे आणि त्यावर आपला अभिप्राय नोंदवावा असे बराच वेळ चालले. शेवटी राजांना कळून चुकले की आपण सांगितलेली सर्व पुस्तके यशवंतरावांनी वाचलेली आहेत. उलट त्याहून अधिक वाचली आहेत.