कथारुप यशवंतराव- सामान्य जनतेचा मुख्यमंत्री

सामान्य जनतेचा मुख्यमंत्री

दीर्घकाळ सत्तेत राहूनही यशवंतराव सामान्य जनतेपासून दूर गेले नाहीत, याचे कारण ' सत्ता ही जनतेमुळे मिळते व जनतेसाठीच ती राबवायची असते ' याचे पक्के भान त्यांना होते. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या साध्या राहणीत फरक पडला नाही.

१९५८ साली डिसेंबरमध्ये एकदा यशवंतराव मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी मधुकरराव चौधरी यांच्या खिरोदा या गावी गेले होते. संस्थेच्या अतिथीगृहात त्यांच्या मुक्कामाची सोय केली होती. कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने यशवंतराव तिथे राहिले. त्या रात्री गावातल्या एका घराला आग लागली. आग लागल्याचे कळताच यशवंतराव स्वत: घटनास्थळी धावून गेले व आग विझवण्यासाठी मदत करू लागले. बादल्या भरून माती व पाणी ओतून आग आटोक्यात आणली जात होती. काही वेळा तर स्वत: यशवंतरावच हातात बादली घ्यायचे. आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत ते तिथेच थांबून होते. आग पूर्ण विझल्यानंतर गावक-यांना धीर देऊन व त्यांचे आभार मानूनच ते झोपायला गेले. एका विशाल राज्याचा मुख्यमंत्री एका छोट्या गावातल्या एका छोट्या घराला लागलेली आग स्वत: पाणी ओतून विझवतोय हे चित्र किती दिलासादायक आहे !