कथारुप यशवंतराव- मी वाद खेळण्यासाठी दिल्लीला गेलो नाही

मी वाद खेळण्यासाठी दिल्लीला गेलो नाही

सन १९६२ साली संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव दिल्लीला गेले. राजधानीत वाद - प्रतिवाद, शह- काटशह या गोष्टी नेहमीच सुरू असतात. साहेब त्यात फारसे लक्ष घालत नसत. ऊठसूठ बोलत राहणे हा त्यांचा स्वभाव नव्हता.

एकदा महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित केले होते. त्या शिबीरात आपले मनोगत व्यक्त करताना एक कार्यकर्ता म्हणाला, ' साहेबांनी दिल्लीत चालणा-या अशा वादात मागे न राहता त्यात हिरीरीनं भाग घ्यावा. आपले साहेब मागे राहतात. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राची प्रतिमा उठून दिसत नाही. '

त्या कार्यकर्त्याचे भाषण संपेपर्यंत यशवंतराव शांतपणे बसून होते. समारोपाचं भाषण करताना पक्षाची ध्येयधोरणे, कार्यकर्त्यांकडून अपेक्षा वगैरेसंबंधी विवेचन करीत यशवंतराव शेवटी या वादाच्या मुद्यापर्यंत पोहोचले. दिल्लीतील वादांसंदर्भात साहेबांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते सरसावून बसले. साहेब म्हणाले, ' दिल्लीला मी जो गेलो, तो वाद खेळण्यासाठी किंवा वाद वाढविण्यासाठी गेलो नाही. देशाच्या ज्येष्ठ नेत्यांनी , पं. नेहरूंनी काम करण्यासाठी मला दिल्लीला बोलावले म्हणून मी दिल्लीला गेलो. त्यांनी नेमून दिलेलं काम सर्वशक्तीनिशी व प्रामाणिकपणाने करणे हेच मी माझे कर्तव्य समजतो. याचा अर्थ वाद खेळण्याची मला माहिती नाही असा नव्हे आणि जेव्हा वाद करण्याची वेळ येईल तेव्हा ' वाद करू का ' म्हणून विचारण्यासाठी आता ज्यांनी सूचना केली त्यांच्याकडे जाणार नाही हे मात्र निश्चित.'

आवाज न चढवता आणि सभ्यता न सोडता समोरच्याला गारद करण्याचे अदभुत सामर्थ्य यशवंतरावांच्या वाणीत होते. या अर्थाने ते एक समर्थ भाषाप्रभूच होते.