चहा घेतल्याबिगर जाऊ देणार नाही !
यशवंतरावांची राहणी साधी होती. घरही साधेच होते, पण भेटीला येणा-या पाहुण्यांच्या आतिथ्यामध्ये ते कधी कमी पडले नाहीत. वेणूताई तर मूर्तिमंत आतिथ्यशीलताच होत्या. आतिथ्यशीलतेचा हा संस्कार यशवंतरावांना आईकडून लाभला होता.
एकदा पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या महिला पदाधिका-यांची सहल चिपळूण, कोयनानगर या भागात गेली होती. एकूण ४५ महिला या सहलीत सामील झाल्या होत्या. प्रवासात त्यांनी कराडचा कृष्णा - कोयनेचा प्रीतीसंगम पाहिला. यशवंतराव तेव्हा केंद्रात मंत्री होते. अनायासे कराडमध्ये आलोच आहोत, तर कराडमधील यशवंतरावांचे घरही पाहूया असा विचार सर्वांनी केला आणि थोड्याच वेळात त्यांची बस सोमवार पेठेतील यशवंतरावांच्या घरासमोर थांबली. अचानक इतके लोक आलेले पाहून शेजारी गोळा झाले. तब्येत बरी नसल्यामुळे विठामाता झोपूनच होत्या. घरात यशवंतरावांच्या थोरल्या बंधूंची सून होती. साधेच पण स्वच्छ घर पाहून त्या महिला कार्यकर्त्यांना यशवंतरावांच्या साध्या राहणीचे रहस्य समजले. त्यांनी विठामातांना आपली ओळख करून दिली. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने त्यांचे आशीर्वाद घेऊन सगळ्याजणी जायला निघाल्या. तेव्हा विठामाता म्हणाल्या, ' कुठे निघालात सगळ्याजणी ? चहा घेतल्याबिगर मी जाऊ देणार नाही.' काहीजणी म्हणाल्या , ' आज्जी, आम्ही ४० - ५० जणी आहोत आणि पूर्वसूचना न देता आलो आहोत. त्यामुळे तुम्ही चहा वगैरे करू नका. विश्रांती घ्या. आम्ही निघतो.' पण विठामाता ऐकेनात. त्या म्हणाल्या, ' मी तशी सोडणार नाही. सरबत तरी घ्यायला पाहिजेच.' मग त्यांनी त्या महिलांना घरातलं मोठ्ठं पातेलं घ्यायला सांगितलं. साखर , लिंबू दिलं व म्हणाल्या, ' आता तुम्हीच करून घ्या बायांनो.' त्याप्रमाणे महिलांनी सरबत घेतलं. विठामातेला समाधान वाटलं. ही हकीकत कोणी तरी यशवंतरावांना सांगितली, तेव्हा ते हसून म्हणाले, ' माझी आई वात्सल्यदेवता आहे.'