कथारुप यशवंतराव- यशवंता, टांग्याला पैसे कोठून दिलेस ?

यशवंता, टांग्याला पैसे कोठून दिलेस ?

यशवंतराव केंद्रात मंत्री झाल्यापासून त्यांचे वास्तव्य दिल्लीलाच होते. त्यांच्या आईचे विठामातेचे वास्तव्य मात्र कराडलाच होते. वृद्धापकाळामुळे त्या ब-याचदा आजारी असायच्या. कामाच्या व्यापातून सवड काढून यशवंतराव अनेकदा, दिल्लीहून आईला भेटण्यासाठी कराडला येत असत.

एकदा आईची तब्येत जास्तच बिघडली. यशवंतरावांना निरोप मिळाल्यावर ते ताबडतोब दिल्लीहून मुंबईला आले व तेथून विख्यात सर्जन डॉ. ग्रॅण्ट यांना घेऊन कराडला आले. विठामाता अत्यवस्थ होत्या. डॉक्टरांनी त्यांना तपासले. प्रकृती चिंताजनक होती. स्मृती आणि विस्मृतीच्या सीमारेषेवर त्या रेंगाळत होत्या. यशवंतराव जवळच बसले होते. अचानक विठाईने यशवंतरावांचे हात धरले. क्षीण आवाजात त्या म्हणाल्या, ' यशवंता, टांग्याला पैसे कोठून रे दिलेस ?' यशवंतरावांचे डोळे पाणावले. विठाईच्या या प्रश्नांचा अर्थ कोणालाच कळेना. थोड्या वेळाने संभाजीबाबा थोरात व यशवंतराव घराबाहेर आल्यावर संभाजीबाबांनी विचारले, ' साहेब, विठाई टांग्याच्या पैशाचे काय म्हणत होत्या ?'

यशवंतराव गंभीर होऊन म्हणाले, ' संभाजीराव, अनेक वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला कॉलेज शिक्षणासाठी रहात होतो. घरची अत्यंत गरीबी होती. त्यामुळे कोल्हापूरहून कराडला येताना मी मुद्दाम रात्री उशिरा येत असे. कारण टांग्याला पैसे नसायचे आणि स्टॅण्डवर उतरल्यावर सर्व सामान डोक्यावर घेऊन पायी चालत घरी जात असे. लोकांना हे दिसू नये म्हणून मी मुद्दाम अंधार पडल्यावरच कराडमध्ये पोचू या बेताने कोल्हापूरहून निघत असे. पण एकदा सामान खूपच जास्त होते. डोक्यावरून नेणे कठीण होते. म्हणून मी टांगा केला व घरी आलो. आईने दारात उभा राहिलेला टांगा पाहिला आणि काळजीने मला विचारले, ' यशवंता, टांग्याला पैसे कोठून रे दिलेस ?' या आठवणीने यशवंतराव पुन्हा गंभीर झाले.

तरुणपणी यशवंतरावांची परिस्थिती हलाखीची होती. पुढे ते आमदार झाले. मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तरीही स्मृती आणि विस्मृतीच्या सीमारेषेवर असलेल्या विठाईमातेला वाटले की, कदाचित यशवंताकडे टांग्यासाठी पैसे नसतील, म्हणून हेलिकॉप्टरने कराडला आलेल्या यशवंतरावांना त्यांनी काळजीने विचारले, ' यशवंता, टांग्याला पैसे कोठून रे दिलेस ?'