आम्ही काळे झेंडेवाले !
यशवंतराव केंद्रीय मंत्री असताना बिहारमधील पाटणा शहरात एकदा त्यांची सभा होती. सभेसाठी जमलेल्या गर्दीत काही गरीब महाराष्ट्रीयन माणसे होती. त्यांना यशवंतरावांची भेट घ्यायची होती, पण पोलीस अधिकारी त्यांना भेटू देत नव्हते. डोक्यावर पागोटे असणारी काही माणसे पोलीसांशी बोलत आहेत हे स्टेजवरून यशवंतरावांनी पाहिले. त्यांनी लगेच आपले सचिव श्रीपाद डोंगरे यांना सांगितले की, त्या माणसांना भेटून त्यांची काय अडचण आहे ते मला सांगा. डोंगरे त्या माणसांना भेटले. तेव्हा त्या माणसांनी आपली अडचण सांगितली. ' आम्ही तीर्थयात्रेला इकडे आलो होतो. आमचे पैसे चोरीला गेले. पोलीसांनी चोर पकडला पण आमचे पैसे पोलीसच आम्हाला देत नाहीत. कारण पोलीसांना देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत.'
डोंगरे म्हणाले, ' मी साहेबांना सांगतो.
तेव्हा ती माणसे म्हणाली, ' आम्हाला साहेबांनाच भेटायचे आहे.
डोंगरेंनी त्यांचे म्हणणे यशवंतरावांच्या कानावर घातले. सभा संपल्यावर यशवंतराव त्यांना भेटले. त्यांची अडचण ऐकली. ते लोक म्हणाले, ' साहेब , आम्हाला प्रवासासाठी पाचशे रुपये उसने द्या.'
यशवंतराव गंमतीने म्हणाले, ' पण तुम्ही कुठले ? तुमची माझी तर ओळख नाही. '
तेव्हा त्यांच्यातला एक माणूस पुढे येऊन म्हणाला, साहेब, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तुम्ही आमच्या भागात सभेला आला होता, तेव्हा आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवले होते ! '
मराठी माणसांचा हा मुलुखावेगळा प्रामाणिकपणा पाहून यशवंतरावांना हसू फुटले. त्यांनी त्या लोकांना पाचशे रुपये दिले व पोलीसांना त्यांचे पैसे परत द्यायला सांगितले.