कथारुप यशवंतराव- तुमचा कान कसा आहे ?

तुमचा कान कसा आहे ?

१९६५ च्या भारत - पाकिस्तान युद्धात मेजर शिवाजीराव शेळके राजस्थान सीमेवरील एका विमानतळावर कर्तव्य बजावत होते. विमानतळावर होणारे शत्रूचे हल्ले विमानविध्वंसक तोफा डागून परतवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शत्रूच्या एका हल्ल्यात मेजर शेळके जबर जखमी झाले. त्यांचा डावा कान कामातून गेला. यशवंतराव तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते.

एक दिवस शेळकेंना तळावरुन हुकूम आला, ' भारताचे संरक्षणमंत्री आज अकरा वाजता तळाला भेट देतील. तसेच अकरा वाजून ५५ मिनिटांनी विमान विध्वंसक तोफेपैकी एका तोफेला भेट देतील व संरक्षण सज्जतेची पहाणी करतील. तुम्ही ठीक ११ वा. ३५ मिनिटांनी तोफ नं. ए - ५ वर हजर रहा. ' संरक्षणमंत्री आपल्याला कोणते प्रश्न विचारतील या विचाराने शेळके घाबरून गेले. भेटीच्या दिवशी साहेब आले. पुढे पायलट कार व त्याच्यामागे डौलदार झेंडा फडकावत एक जीप तोफेजवळ येऊन थांबली. मेजर शेळके पुढे गेले. एक लष्करी सलाम केला. साहेब खाली उतरले. मेजर कमांडर श्रीहरींनी साहेबांनी शेळकेंची ओळख करून दिली. साहेबांनी हस्तांदोलन केले आणि जवळ येऊन प्रेमाने म्हणाले, ' कसं काय शेळके ? तुमचा कान कसा आहे ?

लढाईचा अनुभव कसा काय वाटतो ? सर्व जवान कसे आहेत ?'

साहेबांनी अस्सल मराठीत विचारलेल्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांनी शेळकेंच्या मनावरचा ताण दूर झाला. त्यांनी साहेबांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. तेथून निघताना पुन्हा एकदा मेजर शेळकेंचा हात हातात घेऊन साहेब म्हणाले, ' ठीक आहे शेळके, आम्ही चलतो, काळजी घ्या.'