गो अहेड !
सन १९६५ साली भारत - पाकिस्तान युद्ध सुरू झाले. यशवंतराव तेव्हा संरक्षणमंत्री होते आणि पंतप्रधान होते लालबहाद्दूर शास्त्री. वेळ फार आणीबाणीची होती. १९६२ च्या पराभवातून देश नुकताच कुठे सावरू लागला होता. अशावेळी देशवासियांचा आत्मसन्मान जपण्याची व सैन्याचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी यशवंतरावांवर होती. पंतप्रधानांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा होता. यशवंतराव धैर्याने व चातुर्याने युद्धाची आघाडी सांभाळत होते.
एकेदिवशी संध्याकाळी ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना हवाईदलाचे व सेनादलाचे अधिकारी घाईघाईने त्यांच्याकडे आले. त्यांच्या चेह-यावर चिंता दिसत होती. ते म्हणाले, ' साहेब, काश्मिर आघाडीवर परिस्थिती गंभीर झालीय. शत्रु पुढे सरकतोय. शत्रूचा वेगही चिंताजनक आहे. शत्रूला थोपविण्याचा आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे विमानातून बॉम्बफेक सुरू करणे. त्यासाठी आम्हाला तुमची व पंतप्रधानांची परवानगी हवी आहे.'
यशवंतरावांनी क्षणभर विचार केला . निर्णय घेणे तर आवश्यक होते. त्यासाठी काही मिनिटांचाच अवधी होता. पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात अर्धा तास तरी गेला असता. यशवंतराव ठाम स्वरात सेनापतींना म्हणाले, ' गो अहेड ! ' त्याप्रमाणे भारतीय हवाईदलाने कारवाई सुरू केली. रात्री उशिरा यशवंतराव पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींना भेटले व हवाई दलाला बॉम्बफेकीचे आदेश दिल्याचे सांगितले. शास्त्रीजी म्हणाले, ' अच्छा किया !' या प्रोत्साहनपर शब्दांनी यशवंतरावांना अर्थातच बरे वाटले. पंतप्रधानांच्या संमतीविना त्यांनी एक फार मोठा निर्णय घेतला होता आणि तो अचूक ठरला होता. यशवंतरावांना मनावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटले.