सगळा खर्च सरकारतर्फे करा !
बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्नच ! आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पण या थोर कलावंताची अखेरच्या काळात फार दयनीय अवस्था झाली. आर्थिक विवंचनेने ते त्रस्त झालेले असतानाच त्यांना आजाराने गाठले. उपचारासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. शेवटी आजार वाढल्यावर काही जवळच्या मित्रांनी त्यांना दवाखान्यात भरती केले. दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्रात बालगंधर्वांच्या आजाराची बातमी छापून आली. यशवंतराव तेव्हा केंद्रात मंत्री होते. कशी कोण जाणे, पण यशवंतरावांच्या वाचनात ती बातमी आली आणि ते अस्वस्थ झाले. मराठी रंगभूमीची बहुमोल सेवा करणा-या या थोर कलाकाराला भेटण्यासाठी यशवंतराव स्वत: दवाखान्यात गेले. बालगंधर्वांची विचारपूस केली. बाहेर आल्यावर त्यांनी डॉक्टरांना विचारले, ' खर्च कोण करतंय ?'
डॉक्टर म्हणाले, ' त्यांचे काही जवळचे मित्र वर्गणी काढून खर्चाचा भार उचलत आहेत. ' इतक्या थोर कलावंताची अशी परवड झालेली पाहून यशवंतरावांना अपार वेदना झाल्या. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना फोन केला व म्हणाले, ' वसंतराव , बालगंधर्वांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकारतर्फे करा.'
कलेचा आस्वाद घेणारे अनेक असतात पण कलावंतांची काळजी घेणारे यशवंतरावांसारखे कला रसिक विरळाच.