कथारुप यशवंतराव- अन् शरद पवार आमदार झाले .... !

अन् शरद पवार आमदार झाले .... !

तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातून नवे नेतृत्व पुढे आणणे हे यशवंतरावांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते. एकदा पुण्यात एका कॉलेजमध्ये कार्यक्रमासाठी गेले असता त्यांचे लक्ष स्वागताची जबाबदारी स्वीकारलेल्या तरुण शरद पवारांकडे गेले. शरदरावांचा आत्मविश्वास व संघटनकौशल्य यांनी ते प्रभावित झाले. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी अगत्याने त्यांची विचारपूस केली, त्यांना प्रोत्साहन दिले. नंतरच्या काळात राज्यातील युवक काँग्रेसची जबाबदारी यशवंतरावांनी शरद पवारांवर सोपविली.

१९६६ च्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. शरद पवारांनी अर्ज करावा असे त्यांच्या सहका-यांनी त्यांना सुचविले. शरदरावांचीही तशी इच्छा होती, पण पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. ' बारामती विधानसभा मतदारसंघातून पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी ' असा अर्ज शरदरावांनी पक्षाकडे केला होता. उमेदवार निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीची जेव्हा बैठक झाली. तेव्हा बहुतेक सर्व  नेत्यांनी ' या तरुणाकडे अनुभव व निवडून येण्याची क्षमता नाही म्हणून त्याला टिकीट देऊ नये ' , असं मत मांडलं.
या बैठकीला उपस्थित असणा-या यशवंतरावांच्या मनात मात्र वेगळचं होतं. त्यांनी मनाशी निर्णय घेतला होता. विरोध करणा-या काँग्रेसजनांना त्यांनी विचारले. ' या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील ? निवडणुकीनंतर राज्यात काय चित्र असेल ?'

कोणी म्हणाले, २८८ पैकी २०० जागा मिळतील, तर कोणी म्हणाले , २२५ जागा मिळतील. मग यशवंतराव म्हणाले, ' याचा अर्थ साठ ते सत्तर मतदारसंघात आपला पराभव होणार अशी स्थिती दिसते. या पराभवात आपण एका जागेची भर घालू व शरदला संधी देऊ. '

अशाप्रकारे शरदरावांना उमेदवारी मिळाली. यशवंतराव त्यांच्या प्रचारासाठी देखील आले. सर्वांनी मिळून प्रचार केला आणि विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी शरद पवार विजयी झाले.