कथारुप यशवंतराव- कसा आहेस बाळू ?

कसा आहेस बाळू ?

यशवंतरावांची स्मरणशक्ती अदभुत होती. विशेषत: माणसांना व कार्यकर्त्यांना नावाने हाक मारण्यावर त्यांचा कटाक्ष होता. हे ते मुद्दाम करीत होते असे नव्हे, तर एकूणच माणसांविषयी त्यांना मनापासून आस्था होती. संरक्षणमंत्री असताना एकदा ते रशियाच्या दौ-यावर गेले होते. रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वागत आणि मानवंदना स्वीकारीत उघड्या मोटारीतून यशवंतराव पुढे निघाले होते. सोबत रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह होते. अचानक भोवतालच्या गर्दीतील एका मराठमोळ्या माणसाकडे यशवंतरावांचे लक्ष गेले. साहेबांनी ओळखीचे स्मितहास्य केले. नंतर काही वेळाने ती व्यक्ती यशवंतरावांना भेटली. त्या व्यक्तीने आपली ओळख करून द्यायला सुरुवात यशवंतराव म्हणाले, ' अरे, तू मामा खंडकरांचा बाळू ना ? मी ओळखतो तुला. कसा आहेस ?' हे ऐकून बाळासाहेब खंडकर थक्कच झाले. कराडच्या आपल्या नेत्याने रशियाच्या राजधानीत आपल्याला ' बाळू ' म्हणून हाक मारली हे ते कधीच विसरू शकले नाहीत. साधारण अनुभव असा येतो की , उच्चपदावर असलेली व्यक्ती जुन्या सहका-यांना ओळख देत नाही. ओळख सांगितली तरी त्यांना आठवत नाही. पण यशवंतराव वेगळे होते.

रूदयार्ड किप्लींगने एका कवितेत म्हटले आहे - If you can walk with kings, not lose the common touch.'

यशवंतराव हा कॉमन टच कधीच विसरले नाहीत.