सामान्य जनतेचं न्यायालय !
महाराष्ट्राच्या सर्व भागातील व सर्व थरातील जनतेला यशवंतराव हे आपलं मन मोकळं करण्याचं हक्काचं ठिकाण वाटे. आपली कैफियत इथे ऐकून घेतली जाईल व त्यावर काहीतरी तोडगा निघेल अशी त्यांना खात्री वाटे. संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या मातीशी व जनतेशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. या अनोख्या नात्याची साक्ष देणारा एक प्रसंग घडला.
बागलाण भागातील एक साधी भोळी, अशिक्षित शेतकरी स्त्री गाठोडं बांधून थेट दिल्लीलाच गेली. तिच्या जमिनीवर भावकी टपून होती. अनेक वर्षे वाद चालू होता. बिचारी म्हातारी हतबल झाली. आपण एकटे ही लढाई किती दिवस लढणार हा प्रश्न तिला पडला. शेवटचा उपाय म्हणून तिने दिल्लीतील यशवंतरावांचे घरच गाठले. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतराव आपल्याला नक्कीच न्याय देतील अशी आशा तिला वाटत होती. तिने आपल्या जमिनीचा कायदेशीर गुंता यशवंतरावांच्या कानावर घातला. त्यांनी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले. मग नाशिकच्या जिल्हाधिका-यांना फोन करून तिची अडचण समजावून सांगितली. सौ. वेणूताईंनी तिच्यासाठी छानसा स्वयंपाक केला. तृप्त मनाने ती वृद्धा जेवली. थोड्या वेळाने जेव्हा ती जायला निघाली तेव्हा दोघांनीही आग्रहाने तिला ' १ , रेसकोर्स ' या निवासस्थानी एक दिवस मुक्काम करायला लावला. दुस-या दिवशी वेणूताईंनी तिला साडीचोळी केली व यशवंतरावांनी आपल्या सचिवास तिच्यासोबत स्टेशनपर्यंत पाठवले. सचिवांनी रेल्वेच्या पहिल्या वर्गाचे तिकीट काढून तिला बसवून दिले. आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी थेट दिल्लीपर्यंत आलेली ती वृद्धा सुखरूप घरी परतली, हे ऐकून यशवंतरावांना समाधान वाटले.