कथारुप यशवंतराव-तुम्हीच माझी पसंती आहात !

तुम्हीच माझी पसंती आहात !  
     
१९६२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात यशवंतरावांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. चीनने भारतावर आक्रमण केले. तत्कालिन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन या आव्हानाचा सामना समर्थपणे करू शकले नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागला. यशवंतराव संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. पंतप्रधान पं. नेहरूंनी साहेबांवर पूर्ण विश्वास टाकला होता. पण यशवंतराव संरक्षणमंत्री झाल्यामुळे बिजू पटनाईक व टी.टी. कृष्णम्माचारी नाराज झाले होते. कारण यशवंतराव दिल्लीला जाण्यापूर्वी ते दोघे संरक्षणखात्याचा बराचसा कारभार पहात होते. यशवंतरावांच्या नेमणुकीनंतर त्या दोघांना संरक्षण विभागात काहीच काम उरले नाही. पटनाईक ओरिसाचे मुख्यमंत्री होते आणि कृष्णम्माचारी अर्थसमन्वय खात्याचा कारभार पहात होते. यशवंतराव संरक्षणमंत्री झाल्यावर पी. व्ही. आर. राव यांची नवे संरक्षणसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती. खरं म्हणजे एखाद्या अधिका-याची विशिष्ट खात्याचा सचिव म्हणून नेमणूक करण्यापूर्वी संबंधित खात्याच्या मंत्र्याशी चर्चा करण्याचा संकेत होता. पण राव यांच्या नियुक्तीबद्दल यशवंतरावांशी कसलीही चर्चा करण्यात आलेली नव्हती. शिवाय राव हे अगोदर कृष्णम्माचारी यांच्या अर्थसमन्वय खात्यातच काम करीत होते. याचा अर्थ उघड होता. राव यांची नियुक्ती यशवंतरावांवर जणू नजर ठेवण्यासाठीच झाली होती. त्या नियुक्तीची योजना कृष्णम्माचारी यांचीच होती. पण स्वत: राव या नियुक्तीमुळे अस्वस्थ झाले होते. ते स्वत: यशवंतरावांना भेटले व म्हणाले, ' सर, तुमच्याशी विचारविनिमय न करता, तुमची मान्यता न घेता मला या खात्याकडे बदलले गेले आहे याची मला कल्पना आहे. आज देशाची सुरक्षा धोक्यात आहे आणि अशा नाजूक प्रसंगी संरक्षणमंत्र्यांचा सचिव त्यांच्या पसंतीचा असावा असेच मला वाटते. आपणास अशा एखाद्या अधिका-याची नेमणूक करावीशी वाटल्यास जरूर करावी. मी रजेवर जाईन. '

रावांचा प्रामाणिकपणा यशवंतरावांना आवडला. ते म्हणाले, ' तुम्हीच आता माझी पसंती आहात. काही काळापूर्वी माझे मन द्विधा होते.' या चार शब्दांनी पी. व्ही. आर. जिंकले गेले व ' यशवंतरावांचा माणूस ' झाले.