कथारुप यशवंतराव-माणसे आहेत तशीच स्वीकारायला नकोत का ?

माणसे आहेत तशीच स्वीकारायला नकोत का ?  

संरक्षणमंत्रीपद हे यशवंतरावांसाठी एक आव्हानच होते. एक तर देशाची सुरक्षितता धोक्यात होती. दिल्लीत यशवंतराव नवीन होते, शिवाय त्या खात्यातील अधिका-यांमध्ये सुसंवाद उरला नव्हता. त्यांना एकमेकांविषयी असूया व अविश्वास वाटत होता. जनरल चौधरी आणि पी. व्ही. आर. राव हे दोघेही कर्तबगार अधिकारी होते, पण त्यांचे एकमेकांशी मुळीच पटत नसे. एकदा जनरल चौधरी यशवंतरावांच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी पी. व्ही. आर. राव यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरूवात केली. खरं म्हणजे राव हे कठोर परिश्रम करणारे, कर्तव्यनिष्ठ व बुद्धिमान अधिकारी होते. पण चौधरी म्हणाले, ' लष्करातील ज्येष्ठ अधिका-यांशी ते तुसडेपणाने वागतात. समोरच्या माणसाला तुच्छ समजतात.' चौधरींची बडबड चालू असतानाच यशवंतरावांनी त्यांना थांबवले आणि विचारले, ' जनरल, सेनादलात तुमची किती वर्षे सेवा झाली आहे ?'

' गेली चाळीस वर्षे मी या खात्यात काम करतोय ' जनरल म्हणाले.

' मग मी जर तुम्हाला सांगितले की, तुमच्या वागण्या- बोलण्याच्या पद्धती व चेह-यावरच्या भावभावना बदलून माझ्याशी बोला, तर तुम्हाला ते जमेल का ?' यशवंतरावांनी विचारले. या अनपेक्षित आणि वेगळ्या प्रश्नाने चौधरी चक्रावले . यशवंतरावांना काय म्हणायचे आहे हे त्यांना लवकर कळालेच नाही. मग यशवंतरावच समजावणीच्या सुरात पुढे म्हणाले, ' चौधरी , मी जर पी. व्ही. आर. ना सांगितले की तुमची बोलण्याती पद्धत बदला, चेह-यावरच्या भावना आवरा, तर मला सांगा, पी. व्ही. आर. हे ' पी. व्ही. आर. ' राहतील का ? आज ज्या कामाला आपण हात घातला आहे त्याच्या पूर्तीसाठी पी. व्ही. आर. जसे आहेत तसेच आपण स्वीकारायला नकोत का ?'

चौधरी हसले. त्यांना सर्व काही समजले. तावातावाने यशवंतरावांच्या केबिनमध्ये घुसलेले चौधरी हसत हसत बाहेर पडले. जाताना स्वत:शीच म्हणाले, ' मी किती खुळा होतो ! '