कथारुप यशवंतराव-मला गेले पाहिजे !

मला गेले पाहिजे  !     
  
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. सौ. वेणूताईंची प्रकृती बिघडली होती. मुंबईतील साहेबांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार चालू होते. यशवंतराव सकाळी लवकर बाहेर पडले ते दिवसभर बाहेरच होते. सचिवालयातील कामे संपली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्यानंतर लगेच साडेनऊ वाजता विधीमंडळातील काँग्रेस आमदारांची सभा होणार होती. शिवाय काही भेटीगाठी व्हायच्या होत्या. घड्याळात नऊचे ठोके वाजले आणि अचानक साहेबांना आठवले - वेणूताई रात्री नऊलाच झोपतात. ते मारोतराव कन्नमवार यांना म्हणाले, ' कन्नमवारजी, तुम्ही आजची बैठक सांभाळा, मी आत्ताच घरी जातो . आज दिवसभरात पाच मिनिटेदेखील माझ्या पत्नीचा कुशल समाचार घ्यायला मला वेळ मिळाला नाही. ती आत्ता झोपेल. नऊ वाजल्यानंतर ती जागत नाही. मला गेले पाहिजे ' आणि यशवंतराव निवासस्थानाकडे निघाले. राजकारणामुळे आपण आपल्या पत्नीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, ही खंत त्यांना कायम वाटत असे. पण जेव्हा पत्नीबरोबर थांबणे गरजेचे असायचे तेव्हा समोरची सगळी कामे बाजूला सारून ते वेणूताईंकडे धाव घ्यायचे.