कथारुप यशवंतराव-कारखान्यात मंत्री कशाला ?

कारखान्यात मंत्री कशाला ?    

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात सहकारी चळवळीने मूळ धरले. तात्यासाहेब कोरे यांनी वारणा सहकारी साखर कारखाना सुरु केला तर रत्नाप्पा कुंभार यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखाना सुरु केला. यशवंतराव तेव्हा मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळात पुरवठामंत्री होते. कारखान्याची उभारणी करताना अनेक अडचणी यायच्या. त्यासाठी हे दोघे वारंवार मुंबईला जाऊन यशवंतरावांना भेटत असत. साहेबांनी या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीसाठी खूप सहकार्य केले. कारखान्याची उभारणी पूर्ण झाली. संचालक मंडळ निवडण्याची वेळ आली तेव्हा तात्यासाहेब आणि रत्नाप्पा पुन्हा मुंबईला साहेबांकडे गेले. साहेब तेव्हा चित्रकूट बंगल्यावर रहात होते. रात्र बरीच झाली होती. इतक्या अवेळी या दोघांना पाहून साहेबांना आश्चर्य वाटले. त्या दोघांनी साहेबांपुढे प्रस्ताव मांडला.

' या दोन्ही कारखान्यांचे चेअरमनपद तुम्ही स्वीकारावे अशी आमची विनंती आहे .' साहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. सहकारी चळवळीचे एक हितचिंतक म्हणून त्यांनी या कारखान्यांच्या उभारणीसाठी सहकार्य केले होते. त्यातून त्यांना कसल्याच लाभाची अपेक्षा नव्हती. ते म्हणाले, ' तुम्हा दोघांच्या भावना मी समजू शकतो. माझ्यावरील प्रेमापोटीच तुम्ही असे म्हणताय. मंत्री या नात्याने मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन, पण कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात कोणा मंत्र्याने सामील व्हावे ही गोष्ट मला मंजूर नाही.'

पण दोघांचाही आग्रह कायम होता. साहेबांनी त्यांची समजूत काढली. त्यांना थांबवून घेतले व सकाळी परत पाठवून दिले. सहकारी चळवळीला निरपेक्ष भावनेने मदत करण्याची यशवंतरावांची भूमिका होती. पदाच लोभ त्यांना कधीच नव्हता.