मी कुणाच्या पायाशी बसणार नाही !
यशवंतरावांनी त्यांच्या राजकीय जीवनात विविध क्षेत्रातील विद्वानांचा नेहमीच मान राखला. ते स्वत: व्यासंगी व अभ्यासू राजकारणी होते. साहित्य, राजकारण , सहकार , इतिहास व समाजजीवन हे त्यांच्या आवडीचे विषय होते. अर्थात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. पण पुण्यातील काही स्वयंघोषित विद्वानांना साहेबांची बुद्धिमत्ता दिखाऊ वाटे. आपल्या मार्गदर्शनाशिवाय यशवंतरावांनी काही करू नये अशी त्यांची अपेक्षा असे. याविषयी बोलताना एका मित्राने साहेबांना प्रश्न केला, ' यशवंतराव , तुमच्या बुद्धिमत्तेचा दरारा केसरी कंपूपासून परांजपे, जयकर यांच्यासारख्या विद्वानांनाही वाटतो. इतकं असूनही तुमच्याबद्दल त्यांना प्रेम का वाटत नाही ?'
यावर गंभीर होऊन साहेब म्हणाले , ' पुण्याच्या विद्वान मंडळींना असे वाटते की दुस-यांनी नेहमी आपल्या पायाशी बसून आपला आशीर्वाद घ्यावा. मला आयुष्यात असा कुणाचा आशीर्वाद घेण्याची सवय नाही. माझी मते चुकीची असतील तर एकमेकांत मित्रत्त्वाने होणा-या खुल्या चर्चेनंतर मी ती दुरुस्त करतो. पण मी कुणाच्या पायाशी बसून आशीर्वाद घेणार नाही. परंतु एका बैठकीवर बसून मोकळेपणाने कोणत्याही गोष्टीची खुली चर्चा करण्यात मला आनंद होईल. '
आदर आणि लाचारी यातला फरक यशवंतरावांना चांगलाच माहित होता. त्यांचा आत्मविश्वास अभेद्य होता हेच वरील प्रसंगातून दिसून येते.