यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २७-२४०९२०१२-३

साहेब, 'सकाळ' मध्ये सदा डुम्बरे, अरुण खोरे माझे मित्र आहेत.

हो, माझाही परिचय आहे.  सदाचे वाचन फार छान आहे.  चांगले काम चालते सकाळचे.  श्री. ग. मुणगेकर आहेत फार सज्जन गृहस्थ आहेत.  पाहा सकाळमध्ये सुरू करता येते का ?  मी बोललोय त्यांच्याशी.  मुणगेकरसर म्हणालेत सुरू करूया.  माझ्याकडूनच राहिले आहे.  मी जरा नावाच्या शोधात आहे.

अहो, मी सुचवतो.  अमृता प्रीतमा माहीत आहेत ?  त्यांची एक कलाकृती आहे 'बंद दरवाजा'.  अगदी अशीच, व्यवस्थेने दारे बंद करून घेतलेली.  छान नाव आहे, विचार करा.  त्यांच्याशी बोला.  काय होते ते पाहा.  अडचण आली तर मला सांगा, पण हे फार महत्त्वाचे काम आहे.  तुम्ही हे सारे लिहिलेच पाहिजे.

साहेबांच्या अस्वस्थतेत मी भर घातली.  मी त्यांची क्षमा मागितली.  तसे त्यांनी हातात हात घेतला.

लक्ष्मण, क्षमा कसली मागता ?  आम्हालाच तुम्ही क्षमा केली पाहिजे.

गाडी विरंगुळ्याला पोहचली.  आम्ही चहा घेतला.
जेवून जाणार का ?  बाजरीच्या भाकरी, पिठलं.
नको साहेब, परत येतो त्यावेळी जेवण.
साहेबांना घरी सोडले निरोप घेतला नि परत सातारला फिरलो.  मन मोकळे झाले होते.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका