पत्र - २७
दिनांक २४-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
मला फोर्ड फाउन्डेशनची दोन लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती १९८१ साली मिळाली. मागील पत्रात मी तसे तुला लिहिले होते. मान्य केल्याप्रमाणे चव्हाणसाहेबांनी मला कळवले,
'लक्ष्मण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा खायला यायचे आहे. शशी फार छान मटण करते असे मला अनिल अवचट सांगत होते. तिच्याकडून रेसिपी सुनंदाने, शैला दाभोळकरांनी नेली असल्याचे कानावर आले. यापूर्वी एकदा पोहे खाल्ले होतेच. आता फाउन्डेशनचा पुरस्कार मिळालाय.' साहेब फोनवरून दिल्लीहून बोलत होते. मी अप्पासाहेबांच्या केबीनमधून बोलत होतो त्यांच्याशी.
साहेब जेवायला येणार आहेत हे समजताच अप्पासाहेब म्हणाले आम्हालापण आवडते कोल्हापुरी.
मी अप्पासाहेबांना म्हणालो, याना मग तुम्हीही.
नको नको, हसून म्हणाले, नंतर केव्हातरी पाहू.
दोन-तीन दिवसांनी चव्हाणसाहेब सातार्यातल्या माझ्या घरी आले. शशीने कोल्हापुरी मटण केले होते. साहेब त्या दोन खोल्यांच्या घरात आले. त्यांना गरीबांबद्दल किती आस्था वाटे ते सांगणे कठीण आहे. मलाच संकोचल्यासारखे झाले होते.
हं, लक्ष्मण, आई, बापूराव कुठे आहेत, सोमंथळीला की निरगुडीला ?
मी सांगितले, ते ऐकत नाहीत. इथे या, राहा म्हणालो तर त्यांना चालत नाही. अजूनही पाट्या वळीत हिंडत असतात. एका जागेला राहणे हाच मोठा प्रश्न आहे. एका गावाला राहिले की पोटे बिघडतात. तंबाखू खाऊन थुंकता येत नाही. परसाकडेस खूप लांब जावे लागते. त्यापेक्षा न आलेले बरे. या अशा अडचणी. काय करायचे ?
साहेब हसले. हे मात्र खरे. खेड्यापाड्यातल्या माणसांना मोकळे ढाकळे बरे वाटते. माझे एक मित्र आहेत, ते खेड्यात राहतात. माहीत आहे ना ? त्यांना असे मोकळ्यावर जायची सवय होती. काही केल्या संडासमध्ये पोटच रिकामे होत नसे. अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी ते संडास वापरू लागले. आता काही प्रश्न नाही.
आम्ही सारेच हसलो.
आता शिष्यवृत्तीचे काम कसे करणार ?
यावर मी त्यांना एक छान प्रसंग सांगितला. मला फोर्ड फाउन्डेशनची शिष्यवृत्ती मिळाली याचा आनंद माझ्यासारखा माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही झाला होता. डॉ. अनिल अवचट आणि मी, त्यांच्या स्कूटरवरून, पुण्यातच ए.बी. शहासरांकडे गेलो होतो. मे. पु. रेगे, शहासर, शहासरांच्या घरी होते. ए.बी. शहा ही साहेबांचे चांगले मित्र होते. आम्ही त्यांचेकडे गेलो. त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी माझे अभिनंदन केले. आता काय करणार येवढ्या पैशांचे ? अनिल म्हणाला.
छान झाले. आता तो हे पैसे बँकेत ठेवून पूर्णवेळ काम करणारा कार्यकर्ता होणार आहे. शहासर हसले.
रेगे सर ही विचारात पडले.
शहासर म्हणाले, लक्ष्मण, हे पैसे ज्या कामासाठी मिळालेत त्याच कामासाठी खर्च केले पाहिजेत. ही फार मोठी संधी आहे. महाराष्ट्राला कैकाडी आणि त्यांचे जीवन समजले आहे, पण अजून तळात काय काय दडले आहे ते शोधले पाहिजे. या कामासाठी हा सारा पैसा खर्च करा. त्यातून नवीन खूप काही निघेल.