यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २८- २६०९२०१२-४

मी अगदी खजील झालो होतो.  साहेब, आपण या कामासाठी आलात !  आमचे डोळे उघडलेत.  शशीबद्दल एवढ्या जिव्हाळ्याने बोललात.  तिला आपली मुलगी मानलेत.

तोवर चहा आला.  साहेबांनी चहा घेतला.  डॉ. आंबेडकरांबद्दल म्हणाले, श्रीपतराव, कल्पना करा, आपण सारे स्वातंत्र्यसैनिक देशाल स्वातंत्र मिळावे म्हणून अविरत प्रयत्‍न केले.  ते मिळवले.  पण अखंड स्वातंत्र्य मिळाले नाही.  देशाचे दोन तुकडे झाले.  त्यावेळी बाबासाहेबांचे कितीतरी मित्र अनुयायी त्यांना म्हणत होते जिनांनी लढून पाकिस्तान घेतले, तुम्ही दलितस्थान का घेत नाही ?  या मित्रांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला ते बळी पडले असते तर देशाचे दोनऐवजी तीन तुकडे झाले असते.  पण बाबासाहेबांनी आयुष्यात कधी असला विचार केला नाही.  हे देशावर केवढे उपकार आहेत त्यांचे.  तेही आपल्याएवढेच राष्ट्रभक्त होते.  आपण त्यांना समजून घेतले नाही.  असामान्य बुद्धिमत्तेच्या पुरुषाची ओळख शाहूराजांनी, सयाजीरावांनी ठेवली, त्यांना पोटशी धरले आणि त्यांनी देशाला घटना दिली.  जाती, धर्म, पंथ भेदाभेद यापलिकडे विद्वान माणूस उभा असतो.  मी हल्ली त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास नव्याने करतोय.  त्यांचे चरित्र लिहून त्यांच्या कामाला, कार्यकर्तृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्‍न करणार आहे.

साहेब अर्धाएक तास बसले असतील.  पण पोटात कालवाकालव होत होती.  हा केवढ्या मोठ्या मनाचा माणूस, पण लाल दिवा नाही.  कार्यकर्त्यांचा गराडा नव्हता.  फार वाईट वाटले.  घरातल्या लोकांनी ऐकले होतेच.  साहेब हसतहसत गेले.  आणि मी तुझ्याकडे येण्याचा निर्णय केला.  आता चार दिवस तुला घेऊन जाणार.  आणि थोडा मोकळा झाल्यावर तुझ्याकडेही राहायला येणार.

मला आणि शशीला सारा उलगडा झाला होता.  चव्हाणसाहेबांनी शशीचे माहेरचे दार तिच्यासाठी कायमचे उघडले.  आज अण्णांनाही राहावले नाही.  अण्णांनी आपली दोन नंबरची सून मुस्लिम समाजातली असूनही स्वीकारली.  तिला तिचे स्वातंत्र्य दिले.  नमाज पढ किंवा आमच्या देवाची पूजा कर, तो तुझा प्रश्न.  आज नातवंडांनी आंतरजातीय विवाह केलेत.  सोळा-सतरा जातीतली मुलेमुली आमच्या कुटुंबात आहेत.  कोकणस्थ ब्राह्मण आणि कैकाडी आणि आता बौद्ध असा विस्तार झाला.  आज शशीला माहेर तर मिळालेच, शिवाय घरामध्ये प्रतिष्ठाही मिळाली.  चव्हाणसाहेबांचे मोठेपण किती सांगावे ?  त्यांनी आम्हाला त्यांचे मानले हे किती स्वप्नवत !

सुप्रिया, तुझ्या बाबांची जडणघडण या विचारांनी झाली.  त्यामुळे शरद पवार हे वेगळे रसायन आहे.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका