यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २६-२१०९२९१२-१

आबासाहेब वीर मला माझ्या भावासारखे.  कल्लाप्पा आवाडे तर पाहतच आतात.  तात्यासाहेब कोरे, रत्‍नाप्पा कुंभार, वसंतरावदादा ही सारी माणसे नातइवाईकांपेक्षा मला जवळची.  या प्रत्येकाच्या नावाशी माझे नाव जोडलेले आहे.  अशी हजारो माणसे.  लक्ष्मण, हा माझा खरा ठेवा, इस्टेट.  मी माणसांची संगतसोबत करीत आलो.  त्यांच्या बेरजेचे राजकारण करत आलो.  हे करताना जात धर्म, पंथ असल्या गोष्टी कधीच पाहिल्या नाहीत.  सर्वांभूती सागरेश्वर हा आईने संस्कार केला.  तोच पुढे पिंडप्रकृती झाला.

साहेब, त्यावेळी खाजगी कारखानदारी होती, साखरेची.  तिची स्पर्धा कशी केली ?

मी स्पर्धा नाही केली.  माझी रेषा मी मोठी केली.  आपोआपच त्यांची रेषा छोटी झाली.  सगळी सरकारी शक्ती या नव्या चळवळीच्या मागे उभी केली.  सत्तेचे पाठबळ दिले.  शेतकर्‍यांना, पैसा कमी पडू दिला नाही.  शेतकरी जागृत झाले.  त्यांनी संघटित होऊन त्या त्या परिसरातल्या खाजगी कारखानदारीला सहकाराचा पर्याय दिला.  अनेक खाजगी कारखानदारांनी आपले कारखाने शेतकर्‍यांच्या हवाली केले.  ऊस उत्पादक तर शेतकरीच होते ना ?  हजारो एकर जमिनी या कारखानदारांनी खंडाने घेतल्या होत्या.  ही एक प्रकारची लूटच होती.  या शेतजमिनी शेतकर्‍यांना वाटून द्या, असे हल्ली लोक बोलू लागलेत.  मला ही गोष्ट मान्य नाही.  शेतीवाटपाला मर्यादा येणार आहे.  बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शेतीचे राष्ट्रीयीकरण करा.  आमच्या लोकांनी गांभीर्याने पाहिले नाही.  पण आज ना उद्या या शेतीच्या वाटपाला मर्यादा येणारच ना ?  लोकसंख्या वाढते आहे.  जमीन वाढत नाही.  वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण यात जमिनी जात आहेत.  धरणांसाठी, कालव्यांसाठी, जमिनी निघाल्या.  मी जगभर हिंडलो.  तसा पुस्तकी समाजवाद स्वीकारला नाही.  शेतीचे असंख्य प्रयोग जगभर मी पाहिले.  रशियातले प्रयोग मला खूप जवळचे वाटले.  आपल्याला त्यांच्याच मार्गाचा विचार करावा लागेल.

पोथीनिष्ठा मला मान्य नाही.  आपण आपली उत्तरे आपल्या स्थितीत पाहिली पाहिजेत.  कमाल आणि किमान उत्पन्न ठरवलेच पाहिजे. कुळकायदा राबवण्याबाबत तसेच तुकडेबंदी, तुकडेजोड या कायद्याची अंमलबजावणी मनापासून केली पाहिजे.  याचेच पुढचे पाऊल मी टाकले होते.  सिलींगचा कायदा करून.  

साहेब, या कायद्याने पुरोगामी पाऊल आपण टाकलेत, पण कसे जमवलेत ?

सिलींगला बड्या बागायतदारांनी विरोध करून पाहिला.  पळवाटा शोधल्या.  मी सावधपणे पाऊले टाकली.  जिरायती जमीन, बारमाही पाणीपुरवठा असलेली जमीन दुबार हंगामी पाणीपुरवठा असलेली जमीन अशी वर्गवारी करून, पाच माणसांचे कुटुंब गृहीत धरून एकरावर मर्यादा घालण्याची तरतूद केली.  जिरायती ८० ते १५० एकर.  बारमाही बागायतीला १६ एकर, आणि हंगामी पाणीपुरवठा असलेल जमिनीला २४ एकर अशी मर्यादा घालून देण्यात आली.

साहेब, श्रीमंतांनी पळवाटा काढल्यातच.  अनेकांनी आपल्याच बायकांशी कागदोपत्री घटस्फोट घेऊन तर कित्येकांनी जनावरांच्या नावाने, नोकरचाकरांच्या नावाने जमिनी केल्या.  हा कायदा धाब्यावर बसवला.  

हां, पण कोणताही कायदा केला तरी लबाड लोक त्यातून पळवाटा शोधणारच ना ?  ते लबाड लोक म्हणजे जनता नव्हे ना ?  याउलट या कायद्याचा फायदा मोठ्या वर्गाला झाला.  उत्पादनात घट होऊ नये म्हणून नद्यांचे पाणी अडवणे, वाट काढणे, वीज पंपांना वीज पुरवणे यासाठी मी इरिगेशन बोर्ड, इरिगेशन सर्कल स्थापन केले.  आपल्या देशाचा कणा शेती आहे.  आपण शेतीवर अवलंबून आहोत.  सर्वात मोठा रोजगार शेतीचाच आहे.  शेतीच्या पाण्याचा अभ्यास करायला स.गो. बर्वे कमिशन नेमले केवळ २०-२२ टक्केच जमीन ओलिताखाली येऊ शकते असे कमिशनने सांगितले.  पाणी जेथून मिळेल तेथून उचलण्याची परवानगी राज्यातल्या शेतकर्‍यांना दिली.  हे करताना राज्यात प्रादेशिक ऐक्य कायम राहील हेही पाहिले.  विशेषतः विदर्भ, मराठवाड्याला झुकते माप दिले.  श्रीमंतांना वेसण घालण्याचा प्रयत्‍न केला.  गरीब शेतकर्‍याला बळ दिले.  गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी जेवळी कमी, जेवढे अंतर कमी, तेवढा समाजवाद लवकर येईल.  गरीब आणि श्रीमंत यांच्यातले अंतर कमी करणे म्हणजे समाजवाद.