यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २६-२१०९२९१२-२

सुप्रिया, साहेबांनी किती कमी शब्दांत व्याख्या केली समाजवादाची !  ते सहज बोलत ती सुभाषिते असत.  विचारांसाठी कुठे अडत नसे.  शब्दांसाठी शोधाशोध करावी लागत नसे, की थांबावे लागत नसे.  अंतरीची तळमळ खरी असेल ना, तर नक्कल करावी लागत नाही.  उसनवारी करावी लागत नाही.  शेती नसलेल्या बिगरशेतकर्‍याला शेती खरेदी करता येत नव्हती.  जो शेतकरी असेल, शेती हाच त्याचा व्यवसाय असेल, त्यालाच शेती खरेदी करता यायची.  इतरांकडे कितीही पैसा असला तरी शेती घेता येत नव्हती.  आज काय स्थिती आहे ?  शेती करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला.  'उद्ध्वस्त' या माझ्याच कथासंग्रहातल्या कथा वाचल्यास की तुझ्या लक्षात येईल.  गावगाडा मोडतो आहे.  शेती, शेतकरी देशोधडीला लागतो आहे.  हजारो एकरांचे मालक पुन्हा होऊ लागलेत.  सिलींगचे कायदे, कसणार्‍यांची जमीन असल्या मंगलमय कल्पना मोडीत निघाल्यात.  शेरडं सुद्धा जेवढ्या गतीने झाडे ओरबडत नाहीत तेवढ्या प्रचंड गतीने ओरबडणे सुरू आहे.  पृथ्वी बिचारी कण्हते आहे.  तिचे कण्हणे ऐकायला यशवंतराव हयात नाहीत, हे बरेच झाले म्हणायचे.  हे ओरबाडणे त्यांच्याच्याने सहन नसते झाले.  ते पक्के समाजवादी होते.  नेहरूंचा समाजवाद त्यांनी आपल्या मानला होता.  समाजवादाचा पहिला पाळणा महाराष्ट्रात हलेल हे त्यांचे उद्‍गार त्या काळात देशभर गाजले होते.  मानवेंद्रनाथ रॉय, मार्क्स, लेनिन, स्टॅलिन असे माओपर्यंत अनेक त्यांनी वाचले होते.  पण त्यांची निष्ठा होती नेहरूंच्या समाजवादावर.  कल्याणकारी राज्यावर.  आज काय स्थिती आहे ?  विचारसरणीचा अंत म्हणजे काय तर अराजकाला निमंत्रण, असे ते म्हणत असत.  ते सिद्ध करण्याची सुपारी भांडवलदारांनी जगभरातल्या मवाल्यांना दिली आहे.  त्यातून देश कसा मार्ग काढेल हे माझ्यासारख्या तळात काम करणार्‍या कार्यकर्त्याला समजत नाही.  

वेळ बराच झाला होता.  मला फोर्ड फाउन्डेशनची दोन लक्ष रुपयांची अमेरिकन शिष्यवृत्ती मिळाली होती.  अनेक पुरस्कार मिळत होते.  साहेबांनी मनापासून माझे अभिनंदन केले होते.  अगदी मिठी मारून.

लक्ष्मण, जबाबदारी वाढते आहे.  कानात वारे शिरू देऊ नका.  अनेकजण भेटतील, ऐका, पण स्वतःला बजावीत राहा.  खरेखोटे आपल्या मनाशी तपासा.  आपणच आपले काउन्सिलर.  आपला सदसदविवेक हेच न्यायालय.  तिथे न्याय करायचा.  आता अमेरिकेला निघालात.  मला, वेणूताईंना फार आनंद झाला आहे.  पुढच्यावेळी जेवण तुमच्याकडे.  

नको साहेब, माझे घर छोटे आहे.

घर छोटे आहे.  त्यात माझी मुलगी राहते ना ?  मग आता होईल ना मोठे घर.  घराच्या साईजवर का नाती ठरतात आणि माझे म्हणाल तर देवराष्ट्रामध्ये माझे घर आपण पाहिलेच आहे.  नो प्रॉब्लेम, पुढचे जेवण तुमच्याकडे.

माझा आनंद मनात मावत नव्हता.  मी खाली वाकून नमस्कार केला.  त्यांनी पुन्हा उठून मिठी मारली.  चला पुन्हा भेटूया.

मी सर्किट हाऊसमधून बाहेर पडलो.  दहा वाजून गेले होते.  माझे मन फुलपाखरू झाले होते.  माझ्या पाठीशी साहेबांचे आशीर्वाद होते.

ती. सौ. वहिनींना.  बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका